Marathwada Ground Report: पोशिंद्याच्या बरबादीचा पंचनामा

Marathwada Ground Report: पोशिंद्याच्या बरबादीचा पंचनामा

Marathwada Crops Damage : पंधरा सेकंदाच्या Insta Reels चा पाचच सेकंदात पंचनामा करणाऱ्या Instagram च्या जमान्यात काही हजार शब्दांचा हा Ground Report म्हणजे आपल्या पोशिंद्याच्या बरबादीचा पंचनामा आहे. मराठवाड्यात दिसलेलं धडकी भरवणारं वास्तव...

  • Share this:

28 सप्टेंबरला ड्रोनच्या दृश्यांसह whatsapp वर बातमी येऊन धडकली. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाची. धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडले होते. 70 हजार 845 क्युसेक वेगाने नदी पात्रात पाणी सोडलं. पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांसाठी ही तशी रेग्युलर बातमी पण मराठवाड्यासाठी (Marathwada Floods 2021)  मात्र धडकी भरवणारी होती. त्याच क्षणाला अंदाज आला, मराठवाड्यातल्या पावसाच्या तांडवाचा.

कारण मांजरा धरणाचा इतिहासच बोलका आहे. 1980 ला धरण कोंडलं गेलं. 42 वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा 18 दरवाजे उघडले. याआधी 1089 आणि 2005 मध्ये असं घडलं होतं. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याची तहान भागवणारं मांजरा धरण नुसतं भरणं हीच ब्रेकिंग न्यूज असते. गेल्या दशकभरात कधीतरीच अशी ब्रेकिंग न्यूज ऐकायला मिळाली. धरण कोरडं पडलं म्हणून लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. त्याचा 18 दरवाजातून असा ऊर फुटला असेल, तर आभाळ किती फाटलं असेल हे सांगायला हवामान खात्याची गरज नाही.

शेतांचं काय, पुरानं वाहून गेले रस्तेही!

मुंबईपासून साधारण 500 किलोमीटर अंतरावरच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीच्या काठावरील कळंबच्या दिशेनं निघालो. पुरानं वाहून गेलेल्या रस्त्यावरून वाट काढत पोहोचता पोहोचता दिवस मावळतीला गेला. संध्याकाळी 7.30 वाजता लाईव्ह शो होता. कळंब शहराच्या बाजूनं वहाणाऱ्या मांजराच्या पात्राजवळ पोहोचलो. समोर होती महापुरानं कवेत घेतलेली, पाण्यात बुडालेली हजारो एकर शेती. मधोमध शांतपणे झालेली मांजरा नदी आणि नदीच्या पलिकडे पाण्यात बुडणारा सूर्य.

नरिमन पॉइंट, मंत्रालयासह 80 टक्के दक्षिण मुंबई जाईल पाण्याखाली; आयुक्तांचा इशारा

काही वेळातच सूर्यानं निरोप घेतला. अंधार दाटू लागला. अशावेळी पाण्यात उतरणं शक्य नव्हतं म्हणून पूर ओसरलेल्या वावरात शिरलो. आडव्या झालेल्या सोयाबीनच्या वावरात उभे राहिलो. बाजूलाच एका शेतकऱ्याची काढलेल्या सोयबीनची दहा फुट उंचीची घायाळ गंज उभी होती. पुराच्या तडाख्यातही तग धरून राहिलेली. तिच्यासोबतच्या अनेक गंजींना जलसमाधी मिळालेली. गंजीच्या जवळ जाताच उग्र वास आला. कारण दोन दिवस चार- पाच फूट पाण्यात ती भिजली होती. गंजीत हात घातून चार धाटं उपसली तर थेट वाफाच निघाल्या. हातात आलेल्या धाटांना शेकड्यानं शेंगा लगडलेल्या. पण पाण्यानं नासून गेलेल्या. शेगांनाच मोड फुटलेले. म्हणजे मळणी करून बाजारात नेण्याआधीच त्यांचा बाजार उठला होता. पुराच्या पाण्यात सोयाबीन एकटं नाही, त्याच्या धन्याला सोबत घेऊन बुडालं होतं. हे सगळं बघणं, लाईट्स लावणं, लाईव्ह कनेक्ट करणं सुरु होतं. तोवर एकएक करत शेतकरी जमले.

'वाटलं यंदा कष्टाचं सोनं झालं पण...'

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बाळासाहेब धस नावाचे शेतकरी बोलले. "यावर्षी जून महिन्यापासून चांगला पाऊस झाला. असं वाटत होतं साल चांगलं लागलं. आम्ही चोवीस चोवीस तास शेतात राबराब राबलो. सोयाबीनही दृष्ट लागावं असं खुलत होतं. वाटलं यंदा कष्टाचं सोनं झालं. आपण सुखानं सणवार करू. घरदार लखलखून जाईल. लेकरंबाळाला चार कापडं आणू. या आनंदात होतो. पण 20 सप्टेंबरपासून अचानक वारं फिरलं. सोयाबीन काढणीला आलं आणि एवढा पाऊस लागला की त्यानं सगळं धुवून गेलं. आमचं सोयाबीन, आमची स्वप्न आणि आमची शेतही धुवून नेली. आमच्या आनंदावर नांगर फिरवला. लेकराबाळाचा घास गेला."

'आमच्याकडे कुणीच आलं नाही'

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरमध्ये पोहोचलो. चॅनेलवाले आलेत ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. येडगे मामाच्या शेतात गाव गोळा झाला. एका आशेनं. आपलं शेत टीव्हीवर दाखवल्यावर तरी कुणी पंचनाम्याला येईल. मदत करेल म्हणून. शेतकरी हाताला धरून धरून विनंती करू लागले. एकदा माझ्या शेतात चला. बघा आणि दाखवा सरकारला. शेतात काहीच उरलं नाही. आमच्याकडे कुणीच आलं नाही.

Explainer : भारताला भोगावे लागणार तापमानवाढीचे दुष्परिणाम, या गोष्टी कारणीभूत

तेरणेच्या काठी शेतात गुडघाभर पाणी

उथळ पात्राच्या तेरणेला महापूर आला होता. त्यात नदी पात्र सोडून उभ्या पिकातून वाहिली. पुराच्या पाण्यानं काठावरची हजारो एकर शेती वाहून नेली. अगदी मातीसकट. तेरणेच्या काठावर जिकडे बघावं तिकडे गुडघाभर पाण्यानं डबडबलेली सोयाबीनची शेती होती. तिथं जमलेले शेतकरी सांगत होते, हे काहीच नाही. याच्यापुढे अजून भयानक परिस्थिती आहे. जिथवर जाणं शक्य आहे तिथवर आम्ही जात होतो. चिखलात चप्पल, बुटानं पावलं टाकणं शक्य होईना. म्हणून त्यांना रामराम करत नागव्या पायांनीच चिखल तुडवत पंचनामा सुरु केला. ब्रॅंडेड शूजच्या कुशननं सोकावलेल्या पायांना खडे, काटे रूतत होते. ते जणू जाणीव करून देत होते नागव्या पायांनी रोज राबणाऱ्या पोशिंद्याची व्यथा.

'पुराच्या पाण्यानं भरल्या ताटात माती कालवली'

तेरमधल्या बालाजी देशमुखांनी 7 एकरावर सोयाबीनचं पीक घेतलं. यावर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यांनीही मोठ्या आनंदानं कष्टाला कसूर केला नाही. त्यांनी सांगितलं. “बियाणे, खतं, फवारण्या, अंतर्गत मशागत सगळ्याला एकरी साधारण २३ हजाराचा खर्च केला. कष्टाला फळ मिळालं. झाडाला पानापेक्षा जास्त शेंगा लागल्या. गेल्या कित्येक वर्षात असं जोमदार पीक आलं नव्हतं. सोयाबीन काढणीची तयारी सुरु होती. तिकडे बाजारात भाव पडले आणि इकडे मंगळवारच्या पुरानं डोळ्यादेखत घात केला. पुराच्या पाण्यानं भरल्या ताटात माती कालवली.”

ड्रोनने दाखवली विदारक दृश्याची व्याप्ती

सात एकरात दाणाही उरला नव्हता. संपूर्ण प्लॉट उद्ध्वस्त झालेला. नजर जाईल तिथवर फक्त बरबादीचं चित्र. काळीज पिळवटून टाकणारं. शेतीत पीक उरलंच नव्हतं. शेताचा, पोशिंद्याच्या कष्टाचा आणि स्वप्नांचा मसणवाटा झाला होता. टीव्हीच्या स्क्रीनवरून जगाला, सरकारला त्याची दाहकता कळावी म्हणून बर्ड आय व्ह्यूसाठी ड्रोन कॅमेरा वापरला. ड्रोन जसजसा आकाशात झेपावत होता तसंतसं हेलावून टाकणारं दृष्य कॅमेऱ्यात दिसत होतं. म्हणून ठरवलं. तिथूनच पीटीसी करायचा.

Global Warming:  हे वर्ष मानवतेसाठी चिंताजनक; पाहा काय सांगतोय अहवाल

सहा महिने काम करून पगाराच्या दिवशी ऑफिस बंद व्हावं तसं..

आकाशात उड्डाणासाठी सज्ज झालेल्या ड्रोनच्या कॅमेऱ्यात पाहून बोलायला सुरुवात केली. कोरड्या दुष्काळाची भळभळती जखम वागवणाऱ्या मराठवाडा नावाच्या अश्वथाम्याला आज पुन्हा गुलाब चक्रीवादळाच्या काट्यांनी घायाळ केलंय.

ड्रोन खाली उरला. पण मन थाऱ्यावर येईना. ज्या बालाजी देशमुखांच्या शेतात उभा होतो ते म्हणाले, “आमचं आता काहीच उरलं नाही. जे केलं ते पाण्यात गेलं. साहेब, सहा महिने काम करून पगाराच्या दिवशी तुमचं चॅनेल बंद पडेल तेव्हा तुम्हाला जसं वाटेल तसंच आम्हाला वाटतंय.”

चिखल्यात ओल्या झालेल्या पायात बाभळीचा काटा घुसावा तसे शब्द काळजात घुसले. सरकारी पंचनाम्याच्या सोपस्कारांबद्दल विचारलं, तेव्हा शेतकऱ्यांनी व्यथा बोलून दाखवली. “पाहणी करायला येणाऱ्या साहेबांच्या पायला मातीही लागत नाही. आले कधी तर रोडवरून येतात, रोडवरून जातात. माणसं मात्र आशाळभूत नजरेनं दिवस दिवस बसून आहेत शेत नावाच्या मसणवाट्यात. कुणीतरी येईल रानातल्या प्रेताचा पंचनामा करायला म्हणून. पण कुणी फिरकायला तयार नाही. तुम्हीच सांगा कशी धरावी आशा?”

खरंतर पुराच्या पाण्याखाली गाडल्या गेलेल्या तेरमधल्या शेतीला आणि गावाला गाडण्याचा दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. या मातीच्या पोटात दडलेला हा इतिहास ज्यांनी खणून काढला त्या सोलापूर विद्यापीठातील पुरातत्व शास्राच्या विभाग प्रमुख डाॅक्टर माया पाटील यांनी तो उलगडून सांगितला. कधीकाळी तेर शहर तगर नावानं ओळखलं जात होतं. सातवाहन काळात ते आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होतं. इथलं सुती कापड रोमममध्ये सत्ता गाजवत होतं. दोन हजार वर्षांपूर्वी इथं प्रचंड पाऊस होता. इथं भाताची लागवड केली जायची. कौलारू घरं होती. पण बदलत्या हवामानाचा या शहराला वारंवार फटका बसला. वारंवार पडणारा दुष्काळ, कधी पूर तर कधी भूकंपाने हे शहर गाडलं गेलं. पर्यावरणातल्या बदलांनी वैभवशाली व्यापारी केंद्रातला व्यापार थंडावला. भरभराटीला आलेल्या शहरावर निसर्गाच्या अवकृपेनं अवकाळ पसरली.”

जमिनीच्या पोटातील मातीच्या वेगवेगळ्या थरांनी सांगितलेली ही गोष्ट संशोधनातून समोर आली. पण ही एकट्या तेरची नाही, तर ती मराठवाड्याची गोष्ट आहे. तेरच्या संग्रहालयातले पुरावेच सांगताहेत, नैसर्गिक संकटांनी अनेकदा मातीत गाडूनही त्यातून पुन्हा उभं राहाणं, तग धरून राहाणं मराठवाड्याच्या रक्तात आहे. तोच त्यांचा इतिहास आहे.

कमी होतेय पृथ्वीची चमक, हवामान बदलाचे भयावह परिणाम; पाहा PHOTOS

तेर गाव आणि तेरणेचा काठ सोडताना गाडल्या गेलेल्या पिकांच्या रूपातला आणखी थर कॅमेऱ्यात आणि नजरेत कैद पुढे निघालो.

बाहेर पडताना बहुरूपी अर्थात राईंदर शेगर बाप लेक भेटले. अटक करायला आलोय असं सांगून त्यानं क्षणभर मनोरंजन केलं. दारोदार फिरून दुःखी झालेल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही माणसं अस्सल मनोरंजनाच्या परंपरेचे पाईक. पण त्यांच्यावर आधी कोरोनामुळे आणि आता महापुराने उपासमारीची वेळ आलीय. गावखेड्यात शेतकऱ्याच्या खळ्यावरच्या सुगीवर वासुदेवपासून, पोतराजापर्यंत आणि पांगुळापासून राईंदरापर्यंतच्या माणसांच्या पोटाची खळगी भरते. पण शेतकऱ्याचंच खळं उठल्यानं हे लोक देशोधडीला लागलेत. उरले सुरले गावातले पोतराज, डोंबारी, वासुदेव, बहुरूपी हे भटके शहरातल्या रस्त्यावर फिरताहेत. खेळ मांडून पोटाची खळगी भरताहेत.

आम्हीही आमचा अर्ध्यातासाचा लाईव्ह ‘खेळ’ सोफिस्टिकेटेड भाषेत शो संपवून लातूरच्या दिशेनं निघालो. शहरापासून पाच सात किलोमीटरवर असलेल्या भातखेडा गावातून मांजरा नदी वाहाते. यावर्षी आलेल्या पुरानं या परिसरात मोठं नुकसान केलंय. मांजरा नदीवरील भातखेड्याच्या पुलावर उभा असताना जे चित्र दिसलं ते विषण्ण करणारं होतं. मांजरा नदी कोरडी ठाक पडली तेव्हा लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. आज तिला पाणी आलं तर सगळं वाहून गेलं. गेल्या काही वर्षात लातूरकरांच्या वाट्याला मांजरा नंदीचे अश्रूच आले.

या अश्रूंचा वाटेकरी म्हणजे भातखेड्याचा तरूण शेतकरी मैन्नूद्दीन शेख. यांच्या एका वावरात माती वाहून आल्यानं पीकं गाळात रुतली तर दुसऱ्या वावरातील सुपीक मातीच वाहून गेली. ज्या मैमुद्दिन यांच्या शेतात उभे होतो त्यांनी आमच्या माध्यमातून सरकारला विचारलं, जर ७२ तासाच्या आत क्लेम करा असा फतवा या पीक विमा कंपन्या काढतात? तर मग ७२ तासाच्या आत शेतकऱ्याला मदत का नाहीत करत? नोकरदारांना कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा आहे. त्यांना लगेच पैसे मिळतात. मग आम्हालाच आमच्या हक्कासाठी का भांडावं लागतं?

पीक विम्याचा आक्रोश

पीक विम्याच्या प्रश्नाबद्दलचा हा आक्रोश प्रत्येक ठिकाणी जाणवला. लातूरातील पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील बांधावर भेटले.

2020 चा खरीपाचा विमा दीड वर्षांनंतरही शेतकऱ्यांना मिळाला नाही ही मोठी खंत आहे. रब्बीचंही तसंच झालं. अधिकारी सांगतात केंद्र आणि राज्यांनं आपला वाटा भरला नाही. जिल्हाधिकारी सांगतात ४४ मंडळात अतीवृष्टी झाली. मग प्रश्न आहे पंचनामे कशासाठी? आॅनलाईन, आॅफलाईनचा खेळ कशासाठी? किती शेतकऱ्यांना तुम्ही आॅनलाईनचं ट्रेनिंग दिलं? किती शेतकऱ्यांकडे एन्ड्राॅईड मोबाईल आहे? हा आमचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत म्हणूनही त्यांचा संताप अनावर होतोय.

नांदेड जिल्ह्यातही भीषण परिस्थिती

लातुरातील शेतकऱ्यांशी बोलून नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. गोदावरी आणि पैनगंगेच्या काठावरचं महापुराचं थैमान लातूरच्या तुलनेत मोठं आहे. विशेषतः विदर्भातून वाहत येणाऱ्या पैनगंगा आणि कयाधू नदीच्या खोऱ्यात महापुराची विदारक परिस्थिती आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या टोकावर असलेल्या हदगाव तालुक्यात पोहोचलो. तिथून जवळ असलेल्या पैनगंगेच्या काठावरील हरडपमध्ये सोयाबीन आणि ऊसाच्या पिकाचं अतोनात नुकसान झाल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं. आडवळणाचं गाव गाठता गाठता दुपार सरली. गावात गाडी शिरताच लोक गोळा झाले. अनेकांना वाटलं पंचनामा करायला अधिकारीच आले. मग प्रत्येकाची धांदल उडाली. आम्हाला आपआपल्या शेतात नेण्यासाठी. थोड्यावेळातच त्यांचा गैरसमज दूर केला. पण आशा कायम होती.

गुढघ्याएवढ्या चिखलातून, पाण्यातून चालत बांधावर निघालो. नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा समोर अत्यंत भेदक चित्र होतं. पैनगंगेच्या पुराच्या पाण्यानं ऊसासारखी माणसंही मुळासकट आडवी झाली होती. तीन वर्षाचं पीक हातचं गेलं. एकरी दोन लाखाचं नुकसान झालं. एकरी ५० हजाराचा केलेला खर्च वाहून गेला. ऊसाला विम्याचं कसलंच कवच नाही. त्यामुळे मदतीची आशाच नाही. पण शेतकऱ्यांना फार चिंता आहे ती शेतातल्या वाहून गेलेल्या मातीची. कर्ब नसलेल्या खड्यांना आता कितीही धडका दिल्या तरी त्यातून काही उगवणार नाही याची.

पूर कृत्रिम असल्याचा आरोप

इसापूर धरणाच्या पायथ्याच्या गावांना गिळणारा पूर कृत्रिम असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला. धरण पूर्ण भरेपर्यंत पाणी थोपवून ठेवलं आणि भर पावसात अचानक पाणी सोडल्याचं शेतकरी सांगत होते.

संताप व्यक्त करत होते. जर वाहनाच्या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांना शिक्षा होते. मग हजारो शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून देणाऱ्या धरणाच्या बेमुर्वतखोर अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही हा शेतकऱ्यांचा बिनतोड सवाल होता.

मराठवाड्यात का येतं संकट?

मराठवाड्यावर कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचं संकट कोसळतंय. हे असं का होतंय? या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर सरांना भेटलो. त्यांच्या म्हणण्यानुसार, "हे सगळे हवामान बदलाचे परिणाम आपण भोगतोय. जागतिक हवामान संघटनेच्या 'वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन' नावाच्या संस्थेनं 5 वर्षांपासूनच्या चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि पूराचा अभ्यास केला. त्यातून हे सर्व कार्बन उत्सर्जन वाढत असल्याचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेतील उष्णतेची लाट असो जर्मनी चीनमधला पूर असो किंवा मराठवाड्यातली अतिवृष्टी हवामान बदल हेच मुख्य कारण आहे", असं शास्त्रज्ञ सांगत असल्याचं देऊळगावकरांनी सांगितलं.

जलयुक्त शिवार आणि पूर

शिवाय देऊळगावकरांनी दावा केला की, मराठवाड्यातील पूर परिस्थितीला जलयुक्त शिवार योजना जबाबदार आहे. कारण ही योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेली. योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. त्यामुळे नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारी वाळू, आजूबाजूची झाडी नष्ट झाल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर बनल्याचाही ते आरोप करतात.

देऊळगावकरांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला. बांग्लादेश सारखा गरीब देशातला शेतकरी बदलत्या हवामान संकटाला सुसंगत असे बदल घडवून आणतोय. वारंवार पुराचा सामना करणाऱ्या बांग्लादेशात तरंगत्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला. असे बदल आपल्याला करावे लागतील. मराठवाड्यातील बदलत्या हवामानाचा अभ्यास करणारं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं केंद्र ही काळाजी गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बीडमध्ये स्मशान शांतता

आता दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो होतो. बीडला निघालो. माहिती घेतली तेव्हा कळलं, बीडमधल्या वडवणी परिसरात ११ वेळा अतिवृष्टी झाली. तीनच दिवसांपूर्वी धानोऱ्यात सोयाबीनच्या शेतात एका २५ वर्षाच्या तरूणानं आत्महत्या केलीय. प्राथमिक माहिती घेऊन धोनोऱ्याकडे निघालो. गावात पोहोचलो. लोकांनी घर दाखवलं. अंगणात अनेक माणसं बसलेली. त्यातली स्मशान शांतता बरीच बोलकी होती. घरातल्या कर्त्या पोरानं आत्महत्या केल्यानं अवसान गळालेल्या त्या माऊलीला दोघांनी धरून अंगणात आणलं.

सकाळी आईकडून डब्बा घेऊन गेलेला योगेश गेला तो परत आलाच नव्हता. म्हणून त्या माऊलीला विचारलं, योगेश जाताना काही बोलला का? 'नाही. त्या दिवशी तो काहीच बोलला नाही. पण गेल्याकाही दिवसापासून तो गप्प गप्प होता. खोदून विचारलं तर म्हणायचा. आपलं कसं होईल? माझं कसं होईल? दीड एकर शेतीत काही होत नाही. माझे विषय गेले. घरी पैसे कसं मागू? आतातर शेतातलं सगळंच गेलंय. शिक्षणाचं कसं होणार? बहिणीचं लग्न कसं होणार? मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज कसं फिटणार? पैशांच्या अडचणीनं त्यानं हाय खाली बघा.' त्या माऊलीनं हुंदकासह दुःख गिळलं.

घरात योगेशच्या फोटोपुढे दिवा जळत होता. त्यातलं तेल आणि कापसाची वात कुणाच्या तरी शेतातच पिकली असेल. पण वास्तव हे आहे की ते पिकवणाऱ्या पोशिंद्यालाच ती जगवू शकत नाही.

योगेशने केलेली आत्महत्या शेतकरी आत्महत्या की नुसती आत्महत्या यावर खल होऊ शकतो. पण नैसर्गिक संकटानं इथल्या माणसांच्या आयुष्यात अनेक आर्थिक प्रश्न निर्माण केलेत. प्रपंचाचा गाडाच बंद पडलाय. प्त्याची सोडवणून होत नाही म्हणून त्याच्यापुढे हतबल होऊन तरणीबांड पोरही गुडघे टेकताहेत. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या गळ्याभोवती आवळला जाणारा फास घट्ट होत जातो हा आजवचा इतिहास आहे. त्यामुळे त्याला वेळीच मदत मिळायला हवी. आज शेताचा मसणवाटा झालाय. त्याला मदत मिळाली नाही तर गुडघ्यावर आलेली माणसं मसणवाट्याच्या दिशेनं जातील. कधीही परत न येण्यासाठी.

First published: October 6, 2021, 6:13 PM IST

ताज्या बातम्या