Global Warming:  हे वर्ष मानवतेसाठी चिंताजनक; पाहा काय सांगतोय अहवाल

Global Warming:  हे वर्ष मानवतेसाठी चिंताजनक; पाहा काय सांगतोय अहवाल

मागील 1 वर्षापासून कोरोना महामारीमुळे मानवी उपक्रम कमी झाल्याने प्रदुषणात (Pollution) घट झाली आहे. मात्र प्रदूषण थांबलेले नाहीये.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : जग सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराचा (Covid-19 Pandemic) सामना करीत आहे. याबरोबरच हवामान बदलामुळे (Climate Change) देखील चिंतेत भर पडताना दिसत आहे. हवामान बदलांच्या विध्वंसक परिणामांपासून लोकांना वाचवण्यासाठी 2021 या वर्षात कृतीशील प्रयत्न करावे लागतील, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) दिला आहे.

या शतकात झपाटयाने होतोय हवामान बदल

गेल्या 5 दशकांहून अधिक काळापासून आपल्याला हवामान बदलाच्या दुष्परिणामांविषयी माहिती आणि इशारे मिळत आहेत. तसेच या शतकात हे चित्र अधिकच चिंताजनक बनत असल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि हवामान बदलाचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होत आहे असं यूएनने म्हटलं आहे.

कोरोनामुळे मानवी उपक्रम कमी होऊनही हवामान बदल थांबेना

मागील 1 वर्षापासून कोरोना महामारीमुळे मानवी उपक्रम कमी झाल्याने प्रदुषणात (Pollution) घट झाली आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, हवामानात होत असलेले बदल कोरोनामुळे कमी झालेल्या प्रदूषणामुळे थांबलेले नाहीत. अमेरिकेतील परिषदेपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने हा इशारा दिला होता.

Climate Change Effect: अतिशय वेगाने बदलत आहेत पृथ्वीवरील ही ठिकाणं, थक्क करणारे Before-After फोटो

जो बायडेन यांचे हवामान बदलावर संमेलन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी हवामान बदलाविषयी संमेलनाचे आयोजन केले असून गुरुवारी या संमेलनास (Global virtual summit on Global Warming) सुरुवात झाली. या संमेलनात 40 देशांचे नेते व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या प्रयत्नांना वेग देणे हा या संमेलनाचा उद्देश आहे.

आपण सर्वजण काठावर उभे आहोत

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा निपटारा करताना वेळ झपाट्याने निघून जात आहे. त्यामुळे 2021 या वर्षाला कृतीशील वर्ष (Action Year) म्हणून घोषित करावे लागेल असे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस जनरल अन्टोनियो गुटरेस यांनी जागतिक हवामान संस्थेला स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2020 हा अहवाल प्रसिध्द करण्यापूर्वी सांगितले की आपण सर्वजण विनाशकारी परिणामांच्या अगदी काठावर उभे आहोत.

मानवतेसाठी अत्यंत नाजूक आहे हे वर्ष

गुटरेस यांनी हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे विदारक चित्र मांडताना सांगितले की जगभरातील देशांनी निसर्गा विरोधातील युध्द संपवावे. हे वर्ष मानवतेसाठी (Humanity) अत्यंत नाजूक वर्ष आहे. या अहवालानुसार आता वाया घालवण्यासाठी आपल्याकडे वेळ बाकी नाही. हवामान प्रचंड बदलत असून विध्वंसक परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

2020 ची वाईट अवस्था

या अहवालानुसार, 2020 हे वर्ष सर्वात विक्रमी उष्ण वर्ष (Extreme Heat Year) होते. तसेच यात सांगण्यात आले की साथीच्या आजारामुळे अर्थिक घडामोडी मंदावल्या असल्या तरी हरितगृह वायूचे (Greenhouse Gas) प्रमाण वाढले आहे. गुटरेस म्हणाले, की गेल्या वर्षी मानवी उपक्रमांची संख्या कमी झाल्यामुळे हवामान बदलाच्या प्रक्रियेवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला नाही त्यामुळे पृथ्वीवरचं वातावर भयावह होण्याची प्रक्रिया सुरूच आहे त्याचा वाईट परिणाम मानवी जीवनावर झाला आहे. रोजगार नष्ट झाल्याने लाखो लोकांना आपले घर देखील सोडावे लागले. त्यामुळे हे वर्ष प्रत्यक्ष कृती करण्याचे वर्ष आहे. देशांनी 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सजर्नाची (Zero emission) तयारी दर्शवली पाहिजे. त्यामुळे आतापासूनच सक्रिय होत हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. यासाठी आता आपल्याला मोठी पावले उचलावी लागतील, असे गुटरेस म्हणाले.

First published: April 22, 2021, 7:59 PM IST

ताज्या बातम्या