हवामान बदलाचे अनेक गंभीर परिणाम पृथ्वीवर होत आहेत. पृथ्वीची चमक कमी होणं, हा त्यातील एक गंभीर परिणाम. एका अभ्यासानुसार पृथ्वीची चमक गेल्या 20 वर्षात अर्धा वॉट प्रति वर्गमीटरने कमी झाली आहे. याचा अर्थ पृथ्वीवर बाहेरून पडणारा प्रकाश परावर्तीत करण्याची पृथ्वीची क्षमता कमी झाली आहे. याचाच अर्थ परावर्तीत होऊ न शकलेली उष्णता ही पृथ्वीकडून शोषून घेतली जाते आणि परिणामी पृथ्वीचं तापमान वाढतं.
पृथ्वीवरून जो प्रकाश परावर्तीत होतो, तो चंद्रावर पडतो. गेल्या अनेक वर्षांच्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी हा शोध लावला असून गेल्या दशकात अधिक गंभीर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. पृथ्वीची चमक कमी होण्याचा प्रकार गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक वेगानं घडला आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीची चमक 0.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. सूर्याकडून येणाऱ्या एकूण प्रकाशापैकी 30 टक्के प्रकाश पृथ्वीवरून परावर्तीत होत असतो. सलग 17 वर्षं ही चमक कमी-कमी होत गेल्याचं प्रयोगात दिसून आलं. मात्र हा वेग गेल्या तीन वर्षांत झपाट्यानं वाढला आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियातील बिग बिअर सोलर वेधशाळेतून 1998 ते 2017 या काळातील तपशील एकत्र करून त्यावर संशोधन करण्यात आलं. त्यातूनच पृथ्वीची चमक कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
नासाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागराच्या पूर्वेला येणारे चमकदार ढग परावर्तनाचं काम करत असत. मात्र आता या ढगांची संख्या आणि घनता कमी झाली आहे. पृथ्वीची चमक कमी होण्यात त्याचा मोठा वाटा आहे.
यामागे मानवाने निसर्गात केलेली ढवढाढवळ आणि निसर्गाचं होत असलेलं नुकसान हेच प्रमुख कारण असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. पृथ्वीवर निर्माण झालेली अतिरिक्त उष्णता ही मानवाने तयार केलेल्या घटकांमुळेच निर्माण झाली आहे.
अधिकाधिक उष्णतेमुळे अधिकाधिक ढग जमा होतील आणि पृथ्वीची चमक वाढेल, अशी अनेक शास्त्रज्ञांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलटंच चित्र असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. पुढील पिढ्यांसाठी ही चिंतेची बाब असल्याचं वैज्ञानिक सांगतात.