वॉशिंग्टन 20 मार्च : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन पूर्णपणे फिट आहेत का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. हा सवाल उपस्थित होण्याचं कारण आहे, बायडेन यांचा सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Joe Biden) झालेला एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. मात्र, या पायऱ्या चढताना एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन वेळा त्यांचा तोल गेला आहे. सुदैवानं या घटनेत त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. तीन वेळा घसरले तरीही बायडेन यांना पूर्ण पायऱ्या चढून होताच मागे वळून सलाम केला आणि विमानात जाऊन बसले. राष्ट्रपती जो बायडेन शुक्रवारी अॅटलांटा दौऱ्यावर निघाले होते. तिथे ते आशियाई- अमेरिकी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याठिकाणी जाण्यासाठी ते आपल्या एअरफोर्स वन (Air Force One) या विमानानं रवाना होण्यासाठी पायऱ्या चढत होते. हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजलं जातं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात आले होते तेव्हा या विमानाची खासियत सगळ्यांना समजली होती. आता हेच विमान अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वापरतात. याच विमानात चढताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.
व्हाईट हाऊसच्या महिला प्रवक्त्या कैरीन जीन यांनी असं सांगितलं, की वॉशिंग्टनच्या जॉईंट बेस अँड्र्यूजमध्ये वेगवान वारे वाहत असल्याने ही घटना घडली. कैरीन यांनी सांगितले की, बाहेर खूप वेगाने हवा वाहत होती. यामुळे त्यांचा पाय घसरला असावा. आता यात कितपत तथ्य आहे, हे सांगता येणार नाही.