ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या पोलिसानं थांबवलं की सर्वसामान्य लोकांना जरा भीतीच वाटते. तामिळनाडूमधील (Tamilnadu) तनकाशी (Tenkasi) भागातून प्रवास करणाऱ्या एका मोटरसायकल स्वारालाही एका ट्रॅफिक पोलिसानं (Traffic Police) अचानक थांबवलं तेव्हा असंच वाटलं. पण त्या पोलिसानं त्याला थांबवण्याचं जे कारण सांगितलं आणि त्याची मदत मागितली ते ऐकून तो मोटरसायकलस्वार थक्कच झाला. अगदी आनंदानं त्यानं त्या पोलिसाला मदत केली आणि एका सत्कृत्याचा तोही भागीदार झाला. आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यानं या घटनेचा व्हिडिओ आणि हा हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही घटना आहे तामिळनाडूमधील तनकाशी भागातील. अरुणकुमार मूल्या(Arun Kumar Moolya)हे बंगळूरूमधील(Bengaluru)आयटी तज्ज्ञ आपल्या मोटारसायकलवरून तनकाशीला निघाले होते. त्यांना अचानक या पोलिसानं थांबवलं तेव्हा त्यांना वाटलं की आपण दुसऱ्या राज्यातून आलो आहोत म्हणून थांबवलं वाटतं. पण ते थांबल्यावर त्या पोलिसानं त्यांना विचारलं की तुम्ही कर्नाटकमधून आला आहात का, त्यावर अरुणकुमार यांनी होय असे उत्तर देताच तो पोलिस म्हणाला की, याच मार्गावरून आताच एक बस पुढं गेली असून त्या बसमधून एका महिलेनं चुकून औषधाची बाटली खिडकीतून बाहेर टाकली आहे. तर तुम्ही त्या बसचा पाठलाग करून ती बस गाठून ही औषधाची बाटली त्या महिलेला परत करा.’ हे ऐकून अरुणकुमार चकीत झाले.
पोलीस इतक्या आत्मीयतेनं वागतील अशी अपेक्षाच कोणाला नसते. त्यामुळं अरुणकुमार यांना हा अतिशय सुखद धक्का होता. त्यांनी तत्काळ त्या पोलिसाची विनंती मान्य केली आणि ते त्या बसच्या मागावर निघाले. त्यांनी ती बस गाठली आणि थांबवून त्या महिलेला ती औषधाची बाटली सुपूर्त केली. अरुणकुमार यांना प्रवासाची आवड असल्यानं ते आपल्या मोटारसायकलवरून(Bike Riding)देशभर प्रवास करत असतात. गेली दहा वर्षे ते देशातील विविध भागांना भेट देत असून आतापर्यंत त्यांनी गुजरात, राजस्थान, लेह, लडाख आणि हिमालयात मोटारसायकलवरून प्रवास केला आहे. ते अॅनी अरुण(AnnyArun) नावाचे यू ट्यूब चॅनलही (You Tube Channel) चालवतात. प्रवासादरम्यान भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधतात आणि त्याचं शूटिंग करून ते आपल्या चॅनलवर प्रसारित करतात. हे ही वाचा- चिन्यांना धडकी भरवणारे भारतीय जवान सीमेवर थिरकले;पेगाँग सरोवरावरील VIDEO व्हायरल तनकाशीला जाताना पोलिसानं थांबवल्यावरही त्यांनी सावधगिरी म्हणून त्या पोलिसाबरोबरच्या संभाषणाचा व्हिडिओ मोबाइलवर शूट केला होता. पण हा अनुभव अगदी अनपेक्षित आणि सुखद असल्यानं त्या पोलिसाचा चांगुलपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं त्यांनी हा व्हिडिओ आपल्या यु ट्यूबचॅनेलवर शेअर केला. आपला हा अनुभव वर्णन करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘मी कधीही ‘कॉप बाय स्टॉप’प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा विचार केला नव्हता. पण ही पोस्ट टाकण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.’ हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या पोलिसाचं आणि अरुणकुमार यांचं लोक मनापासून कौतुक करत आहेत. ‘तुम्ही दोघांनी मानवतेला न्याय दिला.अतिशय मोलाची मदत केली आहेत. तुम्हा दोघांना सलाम!’ अशी प्रतिक्रिया एका नेटीझननं व्यक्त केली आहे. तर एकानं प्राउड ऑफ यु अन्ना! असं म्हणत त्या पोलिसाच्या प्रमाणिकपणाला दाद दिली आहे.