युसूफ पठाण-जॉन्सन आमनेसामने
जोधपूर, 03 ऑक्टोबर: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजनंतर सध्या भारतात दिग्गज खेळाडूंची आणखी एक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत काल जोधपूरच्या मैदानात क्वालिफायरचा सामना पार पडला. इरफान पठाणची भिलवाडा किंग्स आणि गौतम गंभीरच्या इंडिया कॅपिटल्स या दोन संघात हा सामना रंगला. त्यात गंभीरच्या इंडिया कॅपिटल्सनं बाजी मारली आणि 5 ऑक्टोबरला होणाऱ्या फायनलमध्ये धडक मारली. पण या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. युसूफ पठाण-जॉन्सनमध्ये धक्काबुक्की क्वालिफायरच्या या सामन्यात भिलवाडा किंग्सनं पहिल्यांदा बॅटिंग केली. विल्यम पोर्टरफिल्ड (59), शेन वॅटसन (65) आणि युसूफ पठाणच्या (48) फटकेबाजीच्या जोरावर 226 धावांचा डोंगर उभारला. पण याच डावात युसूफ पठाण आणि ऑस्ट्रेलियन बॉलर मिचेल जॉन्सनमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आणि नंतर त्या दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. हेही वाचा - Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं… पाहा नेमकं काय झालं? जॉन्सन बॉल टाकल्यानंतर युसूफू पठाणकडे पाहून काहीतरी पुटपुटला. त्यावर पठाणनंही उत्तर दिलं. मग हे दोन्ही खेळाडूं एकमेकांसमोर आले तेव्हा जॉन्सननं पठाणला धक्का दिला. यावेळी अम्पायर्सनी हस्तक्षेप करत दोघांनाही बाजूला केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन ही मोठी नावं आहेत. पण लीजंड्स क्रिकेटमधल्या त्यांच्या या वागण्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. या धक्काबुक्कीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
गंभीरची टीम फायनलमध्ये दरम्यान 227 धावांचं आव्हान गौतम गंभीरच्या इंडिया कॅपिटल्सनं आरामात पार केलं. न्यूझीलंडचा रॉस टेलर आणि विंडीजच्या अॅश्ले नर्सनं दमदार अर्धशतकं झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. टेलरनं 39 बॉल्समध्ये 84 धावा फटकावल्या. तर नर्सनं नाबाद 60 धावांची खेळी केली. त्यामुळे इंडिया कॅपिटल्सनं हा सामना तीन बॉल आणि 4 विकेट्स राखून जिंकला. येत्या 5ऑक्टोबरला या स्पर्धेची फायनल रंगणार आहे.