मुंबई, 31 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवारी सकाळी ऋषिकेश मधील आश्रमाला भेट दिली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी विराट कोहली सपत्नीक आध्यात्मिक सहल करीत आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मंगळवारी सकाळी विराटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुस्थानी असणाऱ्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट दिली. आश्रमाचे जनसंपर्क अधिकारी गुणानंद रयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्कानं ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी विराट आणि अनुष्काने आश्रमात पूजा देखील केली.
ऋषिकेश येथील आश्रमात विराट आणि अनुष्का सार्वजनिक धार्मिक विधीत सहभागी होऊन भंडारा देखील आयोजित करणार असल्याची माहिती आहे.
काहीच दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का आपली मुलगी वामिका सोबत वृंदावनात येथील आश्रमात पोहोचले होते. तेथे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी गुरुजनांकडून आशिर्वाद घेतला.