मुंबई, 5 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विविध कारणांमुळे नेहमीचं चर्चेत असतो. विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कांबळीने दारूच्या नशेत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. एनआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पत्नी अँड्रियाने तक्रारीत म्हटल्यानुसार विनोद कांबळी दारू पिऊन घरी आला होता. त्यावरून तिने त्याला हटकले. तेव्हा कांबळीला राग अनावर झाला आणि त्याने स्वयंपाक घरात जाऊन तव्याचे हँडल आणले आणि तिला फेकून मारले. या कृत्यामुळे पत्नी अँड्रियाला दुखापत देखील झाली. सदर घटनेनंतर अँड्रियाने विनोद कांबळी विरोधात बांद्रे पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. या प्रकरणी कांबळीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
विनोद कांबळी यापूर्वी देखील अनेकदा अशा कारणांमुळे अडचणीत आला आहे. काही वर्षांपूर्वी दारूच्या नशेत कांबळीने सोसायटीच्या चौकीदाराशी आणि राहणाऱ्या लोकांशी वाद घातल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर कांबळीची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तसेच मुंबई पोलिसांनी देखील कांबळीला दारूच्या नशेत कार चालवल्याने अटक केली होती.
अँड्रिया हेविट ही विनोद कांबळीची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी विनोद कांबळीने 2005 रोजी त्याची पहिली पत्नी नोएला लुईस हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर अँड्रिया हेविट हिच्याशी विवाह केला होता. अँड्रिया ही मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होती. हे ही वाचा : विराट कोहली ते शाहरुख खान; सेलिब्रिटींच्या पहिल्या कारबद्दल जाणून घ्या विनोद कांबळी हा भारताचा माजी क्रिकेटपटू असून त्याने भारतासाठी 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 1084 धावा केल्या असून वनडे क्रिकेटमध्ये एकूण 2477 धावा केल्या आहेत. 22 सप्टेंबर 2011 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती.