झिम्बाब्वेचं जोरदार सेलिब्रेशन
पर्थ, 27 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये यंदा अनेक उलटफेर पाहायला मिळाले. सुपर 12 फेरीत मंगळवारी आयर्लंडनं इंग्लंडसारख्या तगड्या संघाला मात दिली. त्यानंतर गुरुवारी झिम्बाब्वेनं पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सुपर 12 फेरीतल्या आतापर्यंतच्या सर्वात रोमहर्षक सामन्यांपैकी एक हा सामना ठरला. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत आणि त्यात पाकिस्तानला हरवल्यामुळे झिम्बाब्वे संघानं सामन्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. डान्स… गाणी आणि मजा मस्ती… पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला हरवल्यामुळे झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा आनंद गगानात मावत नव्हता. सामन्यानंतर या खेळाडूंनी मैदानात धमाल केली. गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला आणि सुरु झालं जोरदार सेलिब्रेशन. झिम्बाब्वे क्रिकेटनं हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
झिम्बाब्वेतही विजयाचा उत्साह झिम्बाब्वेच्या या विजयाचं सेलिब्रेशन त्यांच्या देशवासियांनीही केलं. झिम्बाब्वेमध्ये चाहत्यांनी एकत्र येत जल्लोष केला.
पाकिस्तानवर सनसनाटी मात पर्थमध्ये झालेल्या सुपर 12 फेरीच्या अटीतटीच्या सामन्यान झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं सनसनाटी पराभव केला. या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानसमोर अवघ्या 131 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 129 धावाच करता आल्या. त्यामुळे सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानचं या वर्ल्ड कपमधलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. हेही वाचा - T20 World Cup: ‘कोरोना झाला तरी मैदानात आला!’, मास्क लावून खेळताना ‘या’ खेळाडूचे फोटो Viral सिकंदर रझा ठरला हीरो सिकंदर रझा हा झिम्बाब्वेच्या महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर झिम्बाब्वेनं गेल्या काही सामन्यांमध्ये मोठी कमाल केली आहे. तोच रझा झिम्बाब्वेच्या मदतीला धावून आला. रझानं बॅटिंगमध्ये केवळ 9 धावांचं योगदान दिलं. पण त्यानं ती कसर बॉलिंगमध्ये भरुन काढली. रझानं आपल्या 4 ओव्हरमध्ये 25 धावा देताना पाकिस्तानचे तीन मोहरे टिपले. त्यामुळे झिम्बाब्वेला पाकवर दबाव टाकता आला.