टीम इंडियाचा सेमी फायनलचा रस्ता साफ
सिडनी, 25 ऑक्टोबर: टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कप मोहिमेची एका सनसनाटी विजयानं सुरुवात केली. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानंतर टीम इंडियाचा स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे. सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये भारताचे नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या संघांसोबत आगामी सामने होणार आहेत. या चारपैकी भारताला तीन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता भारतीय संघाचं पारडं उर्वरित तीन संघांविरोधात चांगलचं जड आहे. त्यामुळे रोहित शर्माची टीम इंडिया वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये सहज प्रवेश करेल असं सध्या तरी चित्र आहे.
हेही वाचा - T20 World Cup: रोहित शर्माचा एक मेसेज आणि टीम इंडियाचं दिवाळी सेलिब्रेशन रद्द, पाहा काय घडलं? टीम इंडिया नंबर 2 वर वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये ग्रुप 2 च्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर आहे बांगलादेश. भारत आणि बांगलादेश दोन्ही संघांचे 2 गुण आहेत. पण चांगल्या नेट रनरेटमुळे बांगलादेशी संघ अव्वल स्थानावर आहे. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला मात्र मोठा फटका बसला आहे. कारण दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 24 बॉल्समध्ये 13 धावांची गरज होती. पण पावसाचा व्यत्यय आल्यानं अम्पायर्सनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा खेळ होऊ शकला नाही आणि दोन्ही संघांना 1-1 पॉईंटवर समाधान मानावं लागलं.
याच गटात पाकिस्तान आणि नेदरलँड्सनं अद्याप गुणांचं खातं उघडलेलं नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा वाटत आहे.
भारताचे उर्वरित सामने 27 ऑक्टोबर 2022 भारत वि. नेदरलँड्स, सुपर 12 सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 12.30 वा. 30 ऑक्टोबर 2022 भारत वि. दक्षिण आफ्रिका, सुपर 12 पर्थ स्टेडियम, दुपारी 4.30 वा. 02 नोव्हेंबर 2022 भारत वि. बांगलादेश, सुपर 12 अॅडलेड ओव्हल, दुपारी 1.30 वा., 06 नोव्हेंबर 2022 भारत वि. झिम्बाब्वे, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा.