मोहम्मद शमी
मुंबई, 15 ऑक्टोबर: रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. रविवारपासून (16 ऑक्टोबर) वर्ल्ड कप स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. पण भारतीय संघ आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. तोही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. त्याआधी सध्या पर्थमध्ये टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. दरम्यान काल बीसीसीआयनं भारतीय संघाचा 15 वा शिलेदार कोण हे जाहीर केलं आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी निघताना भारतीय संघ 14 खेळाडूंसहच फ्लाईटमध्ये बसला. ऐनवेळेस जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. पण बीसीसीआयनं लगेचच 15व्या खेळाडूचं नाव जाहीर केलं नाही. पण शुक्रवारी बीसीसीआयनं वर्ल्ड कपसाठीचा 15वा खेळाडू कोण हे जाहीर केलं. जसप्रीत बुमराच्या जागी भारतीय संघात मोहम्मद शमीची वर्णी लागली आहे. पण रोहित शर्मा आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीला खेळवणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर आज रोहितनंच एक अपडेट दिली. शमीबाबत काय म्हणाला रोहित? शमी परवाच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. टी20 वर्ल्ड कपआधीच्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये कोरोनामुळे शमीला खेळता आलं नाही. इतकच नाही तर शमी जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पण तरीही अनुभवाच्या जोरावर शमीची भारतीय संघात वर्णी लागली आहे. शमीच्या फिटनेसबाबत आज रोहितनं एक महत्वाची अपडेट दिली. रोहित म्हणाला… ‘दोन-तीन आठवड्यांपूर्वी शमीला कोरोना झाला होता. त्यावेळी त्याला एनसीएत पाठवण्यात आलं. गेल्या काही दिवसात त्यानं चांगलीच मेहनत केली आहे. सध्या तो ब्रिस्बेनमध्ये आहे. तो उद्या टीम इंडियासोबत सरावाला सुरुवात करेल. त्याची रिकव्हरी व्यवस्थित होत आहे.’ दरम्यान शुक्रवारी बीसीसीआयकडून बुमराऐवजी शमीच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण त्याआधी बुधवारीच शमी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसला होता.
हेही वाचा - Womens Asia Cup: सातव्यांदा जिंकलो… मग सेलिब्रेशन तो बनता है! पाहा हरमन अँड कंपनीचा मैदानातला धिंगाणा, Video बुमराची उणीव जाणवेल यादरम्यान रोहितनं बुमराची उणीव जाणवणार असल्याचं म्हटलं आहे. ‘बुमरा एक चांगला बॉलर आहे. आम्ही अनेक वैद्यकीय तज्ज्ञांशी बोललो पण कुणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वर्ल्ड कप आमच्यासाठी महत्वाचा आहे पण बुमराचं करियर देखील तितकच महत्वाचं आहे. तो आता 27-28 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याला खेळवून आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती.’