सिल्हेट-बांगलादेश, 15 ऑक्टोबर: हरमनप्रीत कौर अँड कंपनीसाठी यंदाचा आशिया कप खास ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळचा भारतानं स्पर्धेतले आठपैकी सात सामने जिंकले आणि विजेतेपदावरही नाव कोरलं. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, दिप्ती शर्मा आणि रेणुका सिंग यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. फायनलमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. आशिया कप जिंकण्याची भारताची ही तब्बल सातवी वेळ ठरली. त्यामुळे या विक्रमी कामगिरीनंतर भारतीय संघानं मैदानातच जोरदार सेलिब्रेशन केलं.
भारतीय महिला संघाचा जल्लोष
या व्हिडीओमध्ये विजेतेपदाची ट्रॉफी मध्ये ठेऊन कॅप्टन हरमनप्रीत कौरसह स्मृती, जेमिमा रॉड्रिग्स आणि इतर खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसत आहेत. बीसीसीआयनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Post-win vibes, be like 🎉 🙌#TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvSL pic.twitter.com/LsUG1PxNiO
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा
यंदाच्या आशिया कप फायनलमध्ये भारतासमोर आव्हान होतं ते श्रीलंकेचं. पण अंतिम फेरीच्या या निर्णायक सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. श्रीलंकेची सलामीची जोडी रन आऊट झाली. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगनं आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची मधली फळी कापून काढली. तिनं 3 ओव्हरमध्ये एका मेडन ओव्हरसह केवळ 5 धावा देताना 3 विकेट्स काढल्या. त्यानंतर राजेश्वरी गायकवाड (2/16) आणि स्नेह राणानं (2/13) तिला सुरेख साथ दिली. ऑफ स्पिनर दिप्ती शर्माला विकेट मिळाली नसली तरी तिनं आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त सात धावा दिल्या. भारतीय गोलंदाजांच्या याच कामगिरीमुळे श्रीलंकेला 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 65 धावाच करता आल्या.
त्यानंतर स्मृती मानधनाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 8.3 ओव्हर्समध्येच विजयी लक्ष्य गाठलं. स्मृतीनं अवघ्या 25 बॉल्समध्ये 6 फोर आणि 3 सिक्सर्ससह नाबाद 51 धावा फटकावल्या. महत्वाची बाब म्हणजे श्रीलंकेनं पाचव्यांदा स्पर्धेची फायनल गाठली होती. पण पाचही वेळा श्रीलंकन संघाला भारताकडूनच पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा - T20 World Cup: 16 टीम्स, 45 सामने, एक ट्रॉफी... पाहा भारतात किती वाजता सुरु होणार टी20 वर्ल्ड कपचे सामने?
जय शाहांकडून कौतुक
दरम्यान भारताच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. ट्विट करुन शाह यांनी हरमनप्रीत कौरच्या संघाचं अभिनंदन केलं.
We 🇮🇳 are CHAMPIONS! What an amazing run by @BCCIWomen at the #AsiaCup2022.
Congratulations to @ImHarmanpreet & her team for raising the bar in women’s cricket. The convincing win in the final is a testimony to #TeamIndia’s consistency and class 👏 pic.twitter.com/M7PJyqq0Xl — Jay Shah (@JayShah) October 15, 2022
हेही वाचा - Womens Asia Cup: 'कॅप्टन कौर'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, हरमनप्रीतनं मोडला धोनीचा 'हा' विक्रम
टीम इंडियाचा आशिया कपमध्ये दबदबा
2004 पासून आतापर्यंत आशिया कपमध्ये प्रत्येकवेळी भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या 8 पैकी आठही स्पर्धांमध्ये भारतीय संघानं फायनल गाठली होती. पण 2018 सालचा अपवाद वगळता भारतीय संघानं उर्वरित सातही स्पर्धांमध्ये आशिया कपवर आपलं नाव कोरलं. 2018 मध्ये बांगलादेशकडून भारताला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण यंदाच्या स्पर्धेत 8 पैकी 7 सामने जिंकून पुन्हा एकदा आशिया कप आपल्या नावावर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india, Women's cricket Asia Cup