वर्ल्ड कप सेमी फायनलचं चित्र स्पष्ट
मेलबर्न, 06 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 फेरीतला अखेरचा सामना आज मेलबर्नमध्ये पार पडला. भारतानं या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करुन ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान पटकावलं. सूर्यकुमार यादव (ना. 61) आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेला 187 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव 115 धावात आटोपला. तर आज सकाळी पाकिस्ताननं बांगलादेशला हरवून पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं. त्यामुळे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. 9 आणि 10 नोव्हेंबरला सिडनी आणि अॅडलेडमध्ये सेमी फायनलचे सामने पार पडणार आहेत.
सेमी फायनलच्या लढती ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरले होते. त्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियानंही चांगला संघर्ष केला. पण यजमान आणि गतविजेत्या कांगारुंना यंदा सेमी फायनलआधीच गाशा गुंडाळावा लागला. दुसरीकडे सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडना सर्वात मोठा धक्का दिला. त्यामुळे पाकिस्तानला अखेरच्या क्षणी एक संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ग्रुप 2 मधू भारत आणि पाकिस्तान हे दोन आशियाई संघ सेमी फायनलमध्ये आले आहे.
बुधवार, 9 नोव्हेंबर न्यूझीलंड वि. पाकिस्तान, पहिली सेमी फायनल सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दु. 1.30 वा. गुरुवार, 10 नोव्हेंबर भारत वि. इंग्लंड, दुसरी सेमी फायनल अॅडलेड ओव्हल, दु. 1.30 वा.
हेही वाचा - Cricket: वर्ल्ड कप खेळलेल्या ‘या’ खेळाडूवर बलात्काराचा आरोप, सिडनीत अटक; पाहा काय आहे प्रकरण? 15 वर्षांनी मेगा फायनल? 13 नोव्हेंबरला टी20 वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अंतिम फेरीचा हा सामना खेळवला जाईल. पण त्याआधी भारत आणि पाकिस्ताननं सेमी फायनलमध्ये आपापल्या लढती जिंकल्या तर वर्ल्ड कपच्या मैदानात 15 वर्षांनी क्रिकेट चाहत्यांना एक मेगा फायनल पाहायला मिळेल. 2007 साली पहिल्यावहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानलाच हरवून विजेतेपद पटकावलं होतं.