रॉस टेलर, बेन स्टोक्स
मुंबई, 15 ऑगस्ट**:** माजी किवी कर्णधार रॉस टेलरनं नुकतंच आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. ‘रॉस टेलर – ब्लॅक अँड व्हाईट’ या आपल्या आत्मचरित्रात टेलरनं आपल्या क्रिकेट कारकीर्दीतल्या अनेक घटना आणि अनुभव नमूद केले आहेत. हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यापासून गेले काही दिवस त्यातल्या अनेक खुलाशांवरुन क्रिकेटविश्वात अनेक चर्चा रंगतायत. आणि आता त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. रॉस टेलरनं आपल्या आत्मचरित्रात इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि 2019 साली इंग्लंडच्या विश्वविजयाचा हीरो बेन स्टोक्सच्या एका निर्णयाबाबत खुलासा केला आहे. जवळपास बारा वर्षांपूर्वी स्टोक्सला इंग्लंडकडून नव्हे तर न्यूझीलंडकडून खेळण्याची इच्छा होती असं टेलरनं म्हटलंय. टेलरकडून स्टोक्सला विचारणा रॉस टेलरनंच इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला न्यूझीलंडमध्ये खेळणार का? असं विचारलं होतं. स्टोक्सलाही न्यूझीलंडमध्ये खेळण्याची इच्छा होती. त्यामुळे टेलरनं न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ जस्टिन वॉन यांना मेसेजही पाठवला होता. आणि स्टोक्ससंदर्भात त्यांना सांगितलं होतं. पण वॉन यांनी स्टोक्सला स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल असा प्रस्ताव ठेवला. स्टोक्स तेव्हा 18-19 वर्षांचा होता. आणि इंग्लंडकडून त्यानं प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यात त्यानं रस दाखवला नसता असता असं टेलरनं म्हटलंय. ही बाब त्यान वॉन यांना बोलूनही दाखवली. पण ही गोष्ट फार पुढे गेली नाही. त्यानंतर स्टोक्सचा इंग्लंड संघात समावेश झाला. आणि एक अष्टपैलू म्हणून त्यानं आपली संघातली जागाही भक्कम केली. हेही वाचा - Rahul Dravid: ‘जंगलात 4 हजार वाघ पण राहुल द्रविड एकच!’ पाहा रॉस टेलरच्या आत्मचरित्रातला भन्नाट किस्सा न्यूझीलंड स्टोक्सची जन्मभूमी बेन स्टोक्सला न्यूझीलंडकडून खेळण्याची इच्छा होणं याचं मूळ कारण म्हणजे तो मूळचा न्यूझीलंडचाच. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये त्याचा जन्म झाला. पण वयाच्या बाराव्या वर्षी त्याचं कुटुंब इंग्लंडमध्ये गेलं. कारण रग्बी कोच असलेले त्याचे वडील गेरार्ड स्टोक्स यांना इंग्लंडच्या एका क्लबकडून प्रशिक्षकपदाची ऑफर मिळाली होती. पुढे स्टोक्स कुटुंब पुन्हा ख्राईस्टचर्चला परतलं. पण मधल्या काळात इंग्लंडमध्ये स्टोक्सची क्रिकेट कारकीर्द बहरत गेली आणि तो इंग्लंडमध्येच स्थायिक झाला.