श्रीलंकेच्या धनुष्का गुणतिलकाला अटक
सिडनी, 06 नोव्हेंबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधून श्रीलंकेचं आव्हान सुपर 12 फेरीतच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी रवाना झाला. पण या टीमचा एक सदस्य मात्र सध्या सिडनी पोलिसांच्या ताब्यात आहे. यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकन टीमचा भाग असलेल्या आणि काही सामन्यात खेळळेल्या धनुष्का गुणतिलकाला सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. 2 नोव्हेंबरला एका महिलेनं दिलेल्या तक्रारीवरुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? गेल्या आठवड्यात सिडनीतल्या एका महिलेनं केलेल्या तक्रारीवरुन गुणतिलकाला अटक करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरला या महिलेनं त्याच्यावर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ऑनलाईन डेटिंह अॅपवर ते दोघं बराच काळ संपर्कात होते. दरम्यान 31 वर्षीय गुणतिलकाला एका हॉटेलमधून रात्री 1 वाजता अटक करण्यात आली.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं स्पष्टीकरण दरम्यान श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं गुणतिलकाच्या अटकेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. धनुष्का गुणतिलकाला एका महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं श्रीलंका क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे.
वर्ल्ड कपमध्ये खेळला गुणतिलका धनुष्का गुणतिलका यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यात खेळला होता. पण दुखापतीमुळे त्यानंतर तो संघाबाहेर होता. त्यानं श्रीलंकेकडून आतापर्यंत 101 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2018 साली अशाच एका आरोपामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. पण त्यावेळी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती आणि तो पुन्हा श्रीलंकन संघात परतला होता. हेही वाचा - Ind vs Zim: झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्याआधीच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये… पाहा पॉईंट टेबल कसं बदललं? श्रीलंका मायदेशी परत दरम्यान श्रीलंकेचा संघ वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आल्यानं मायदेशी परतला आहे. आशिया कप जिंकून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या श्रीलंकेला वर्ल्ड कपमध्ये मात्र म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही. ग्रुप 1 मध्ये 5 पैकी केवळ दोन सामने श्रीलंकेनं जिंकले. त्यामुळे माजी विजेत्या श्रीलंकेला सुपर 12 फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. त्यात या प्रकरणामुळे एका वेगळ्या कारणामुळे श्रीलंकन संघ चर्चेत आला आहे.