भारत वि. दक्षिण आफ्रिका
पर्थ, 30 ऑक्टोबर: आधी लुंगी एनगिडी आणि त्यानंतर डेव्हिड मिलर-एडन मारक्रम या जोडीनं केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेनं सुपर 12 फेरीत टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनलच्या तिकीटासाठी अजूनही वेटिंगवरच राहावं लागणार आहे. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या ओव्हरमध्ये 2 बॉल बाकी ठेऊन हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
मिलर-मारक्रमची भागीदारी डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रमची भागीदारी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक ठरली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. मारक्रमनं 41 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. तर मिलरनं नाबाद 59 धावा करुन दक्षिण आफ्रिकेला विजयाकडे नेलं. दक्षिण आफ्रिकेची एक वेळ 3 बाद 24 अशी अवस्था झाली होती. पॉवर प्लेमध्येही दक्षिण आफ्रिकेला 40 धावाच करता आल्या होत्या. पण मारक्रम आणि मिलर जोडीनं दक्षिण आफ्रिकेला या अडचणीतून बाहेर काढलं. अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये दोन धक्के देत या सामन्यात टीम इंडियाच्या आशा उंचावल्या होत्या. पण एडन मारक्रम आणि मिलरनं टीम इंडियाच्या अपेक्षांवर पाणी फेरलं.
सूर्यकुमारची एकाकी झुंज त्याआधी सूर्यकुमार यादवच्या 68 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 133 धावा करता आल्या. सूर्यकुमारचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताच्या 8 खेळाडूंना दुहेरी धावा करण्यात अपयश आलं. रोहित (15) आणि राहुल (9) ही सलामीची जोडी 26 धावातच माघारी परतली. त्यानंतर फॉर्मात असलेला विराट कोहलीही (12) आज लवकर बाद झाला. पहिल्यांदाच संधी मिळालेल्या दीपक हुडाला भोपळाही फोडता आला नाही तर हार्दिक पंड्याही अवघ्या 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे भारताची नवव्या ओव्हरमध्ये 5 आऊट 49 अशी स्थिती झाली होती. या पाचपैकी 4 विकेट्स या लुंगी एनगिडीनं घेतल्या. हेही वाचा - Ind vs SA: बॉलर म्हणतोय नाही… पण कार्तिकचा हट्ट… रोहितनं घेतला रिव्ह्यू, पाहा मग काय घडलं? पण एका बाजूनं सूर्यकुमार यादवनं आपला हल्ला सुरुच ठेवला. त्यानं दक्षिण आफ्रिकन गोलंदाजी फोडून काढली आणि मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पण एका बाजूनं टीम इंडियाच्या विकेट्स पडत गेल्या. सूर्यानं 6 फोर आणि 3 सिक्सर्ससह 68 धावांची आपली इनिंग सजवली आणि टीम इंडियाला एक आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं.