इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय
इंदूर, 4 ऑक्टोबर: भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिकेचा शेवट विजयानं केला. तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीतले सामने जिंकून भारतानं आधीच ही मालिका खिशात घेतली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी इंदूरची आजची लढत प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेनं 227 धावांचा डोंगर उभारला. पण तो सर करण्याच्या प्रयत्नात टीम इंडियाला सर्वबाद 178 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे भारतानं हा सामना 49 धावांनी गमावला. वर्ल्ड कपआधी टीम इंडियासाठी हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
भारतीय टीम का झाली फेली? इंदूरची खेळपट्टी बॅट्समनसाठी खरं तर नंदनवन स्वरुपाची होती. जर विकेट्स हातात असत्या तर 227 धावांचा पाठलाग टीम इंडियासाठी तितका कठीण ठरला नसता. कारण रिषभ पंत, दिनेश कार्तिक सूर्यकुमार यादव या महत्वाच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात करुनही आपल्या विकेट्स फेकल्या. पण तरीही तळाच्या खेळाडूंनी केलेल्या प्रतिकारामुळे भारताला 178 धावा करता आल्या. बर्थडे बॉय रिषभ पंतनं लुंगी एनगीडीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स ठोकले होते. पण त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर खराब फटका खेळून पंत 27 धावांवर बाद झाला. तीच गत दिनेश कार्तिकची. कार्तिकनंही अवघ्या 21 बॉल्समध्ये 46 धावा ठोकल्या होत्या. पण स्विच हिटच्या प्रयत्नात त्यानं आपली विकेट फेकली. सूर्यकुमारच्या बाबतीतही तेच घडलं. बॉलिंग डिपार्टमेंटची समस्या जैसे थे… आशिया कपपासून टीम इंडियाला एकच चिंता सतावत आहे ती म्हणजे भारताचा कमकुवत बॉलिंग अटॅक. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यांमध्ये भारतीय बॉलर्सना आपला प्रभाव पाडता आला नाही. अपवाद केवळ तिरुअनंतपूरम टी20चा. त्या सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही मालिकांमध्ये भारतीय बॅट्समनची भूमिका महत्वाची ठरली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघव्यवस्थापनाला बॉलर्सच्या कामगिरीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
रुसोची नाबाद शतकी खेळी त्याआधी इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं गुवाहीटीमधली बॅटिंग पुढे सुरु ठेवली असंच चित्र होतं. फक्त यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या डाववाचा नायक होता डेव्हिड मिलरऐवजी रायली रुसो. रायली रुसोनं भारतीय आक्रमणाचा खरपूस समाचार घेतला आणि पहिल्या दोन सामन्यांचा हिशोब चुकता केला. तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीच्या सामन्यात रायली रुसो खातं न खोलताच माघारी परतला होता. पण इंदूरच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करताना रुसोनं नाबाद शतक झळकावलं.
रुसोनं टी20 कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकताना नाबाद 100 धावा केल्या. त्यानं आपलं शतक अवघ्या 48 बॉल्समध्ये 7 फोर आणि 8 सिक्सर्सच्या मदतीनं पूर्ण केलं. याशिवाय क्विटन डी कॉकसह त्यानं तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारीही साकारली त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा उभारता आल्या. रुसोनं दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 21 टी20 सामन्यात 152 च्या सरासरीनं 558 धावा केल्या आहेत. हेही वाचा - MS Dhoni: भारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी? 2011 चा ‘धोनी रिटर्न्स’ डी कॉकचं सलग दुसरं अर्धशतक गुवाहाटीत 69 धावांची खेळी करणाऱ्या क्विंटन डी कॉकनं इंदूरमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला. त्यानं सलामीला येत 43 बॉल्समध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावा केल्या. डी कॉकनं रुसोच्या साथीनं दक्षिण आफ्रिकन डावाला आकार दिला. गेल्या सामन्यातही डी कॉकनं डेव्हिड मिलरच्या साथीनं 174 धावांची भागीदारी केली होती. मिलरनं त्या सामन्यात 106 धावा ठोकल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेनं तो सामना 16 धावांनी गमावला.