मुंबई, 4 ऑक्टोबर: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. 11 वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतानं 28 वर्षांनी पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. तोच वर्ल्ड कप विजेता कॅप्टन धोनी सध्या टीम इंडियाचा भाग नाही. पण टीम इंडियाचा हा माजी कॅप्टन ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ जिंकावा यासाठी जोरात प्रयत्न करतोय. धोनीनं नुकताच एक प्रमोशनल व्हिडीओ तयार केला आहे. या प्रमोशनल व्हिडीओमध्ये त्यानं जाहीर केलं आहे की 2011 सालच्या वर्ल्ड कपमधली त्याची हेअरस्टाईल लकी चार्म म्हणून पुन्हा करणार आहे. धोनीनं हा व्हिडीओ त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सलूनमध्ये बसलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी त्याच्या हेअरस्टाईल संदर्भात हेअर स्टायलिशला काही सल्ले देताना पाहायला मिळतंय. करियरच्या सुरुवातीपासूनच धोनी त्याच्या मैदानावरच्या कामगिरीइतकाच त्याच्या हेअर स्टाईलसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. धोनीनं 2007 मध्ये भारताला पहिला टी20 विश्वचषक जिंकून दिला होता. यानंतर त्यांचे लांब केस चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर 2011 च्या विश्वचषकादरम्यान त्यानं बारीक केस ठेवले. आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यानं मुंडण केलं होतं. हेही वाचा - Womens Asia Cup: वुमन ब्रिगेडची विजयी हॅटट्रिक, आशिया कपमध्ये पुन्हा चमकली ‘ही’ मुंबईची पोरगी
काय आहे धोनीची ‘आयडिया?’
काही दिवसांपूर्वी धोनीनं एक फेसबुक पोस्ट करत चाहत्यांना काहीतरी नवीन बातमी घेऊन येणार असल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्यानं ओरिओ कुकीजचं रिलॉन्चिंग केलं. पण याचं कनेक्शन धोनीनं वर्ल्ड कपशी जोडलं. 2011 साली ओरिओ कुकीजचं लॉन्चिंग झालं त्याच वर्षी भारतानं वर्ल्ड कप जिंकला. आणि म्हणूनच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपआधी धोनीनं त्या कुकीजचं रिलॉन्चिंग केलं असल्याचं सांगितलं. आणि आता त्यानं 2011 ची हेअर स्टाईल करुन त्याचंही कनेक्शन आगामी वर्ल्ड कपशी जोडलं आहे.
धोनी 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये मेंटॉर महेंद्रसिंग धोनीनं 2021 साली UAE मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम पाहिलं होतं. पण त्या स्पर्धेत भारताची कामगिरी समाधानकारक ठरली नव्हती. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं संघानं ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन सामने गमावले. अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध भारतानं विजय मिळवला. पण बाद फेरी गाठण्यासाठी ती कामगिरी पुरेशी ठरली नाही.

)







