सिडनी, 05 जानेवारी : सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर बेलिंडा क्लार्क हिचा कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. बेलिंडा ही जगातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे जिचा पुतळा स्टेडियममध्ये उभारण्यात आला आहे. 2021 मध्ये 73 क्रिकेटपटूंचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा खेळाडूंची नावे समोर आली नव्हती. बेलिंडा यातील 15 वी क्रिकेटर आहे जिचा पुतळा सिडनी क्रिकेट स्टेडियमवर उभारण्यात आला आहे. तिचा पुतळा प्रसिद्ध मूर्तीकार कॅथी वीजमॅन यांनी तयार केला आहे. बेलिंडा क्लार्क ही ऑस्ट्रेलियाची तिसरी महिला खेळाडू आहे जिचा पुतळा उभारला गेला आहे. हेही वाचा : स्मिथला मोडता आला नाही सचिनचा विश्वविक्रम, थोडक्यात गमावली संधी बेलिंडाने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत बोलताना म्हटलं की, माझा पुतळा उभारल्याने खूपच आनंदी आहे. जेव्हा लोक हा पुतळा पाहतील तेव्हा त्यांना माझी आठवण होईल आणि लोकांना माहिती होईल की मी कोण आहे. माझ्या इथल्या प्रवासाची गोष्ट काय आहे समजेल. यातून त्यांना प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत आपलं ध्येय पूर्ण करता येईल. मला वाटतं की लोकांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकावं की आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचता येईल. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वात पहिलं द्विशतक करण्याचा विक्रम बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहे. बेलिंडा क्लार्कने सचिनच्या आधी 1997 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर 13 वर्षांनी सचिनने 2010 मध्ये द्विशतक झळकावलं होतं. बेलिंडाने 1997 च्या महिला वर्ल्ड कपवेळी डेन्मार्कविरुद्ध झालेल्या सामन्यात 155 चेंडूत 229 धावा केल्या होत्या. बेलिंडाच्या त्या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात 412 धावा केल्या होत्या. तर डेन्मार्कचा संघ अवघ्या 49 धावात बाद झाला होता. हेही वाचा : माझं रेकॉर्ड मोडता मोडता तो…, शोएब अख्तरची उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया बेलिंडाने 1991 मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर वयाच्या 23 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाची कर्णधार बनली. जवळपास 12 वर्षे तिने कर्णधारपद सांभाळलं. तिच्या नेतृत्वाखील ऑस्ट्रेलियाने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला. 2005 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर ती महिला ऑस्ट्रेलिया क्रिकेटची सीईओसुद्धा होती.