सचिनचा 'मास्टर क्लास'
रायपूर, 29 सप्टेंबर: सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव. सचिननं आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप देऊन जवळपास एक दशक उलटलं आहे. पण सचिन या नावाची जादू आजही कायम आहे. म्हणूनच वयाच्या 49 व्या वर्षीही सचिन जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरतो तेव्हाही ते मैदान प्रेक्षकांनी भरुन जातं. सध्या असाच काहीसा अनुभव येतोय रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज या दिग्गजांच्या टी20 मालिकेदरम्यान. याच मालिकेत सचिनच्या इंडिया लीजंड्स संघानं सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. दरम्यान हा सामना काल सुरु झाला होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे काल पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे उर्वरित खेळ आज राखीव दिवशी पूर्ण करण्यात आला. इंडिया लीजंड्स फायनलमध्ये सचिनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया लीजंड्सनं सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया लीजंड्सचा 5 विकेट्सनी पराभव केला. नमन ओझाच्या 90 धावांची खेळी आणि इरफान पठाणणं 12 बॉलमध्ये ठोकलेल्या नाबाद 37 धावांमुळे इंडिया लीजंड्सनं 172 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. त्यामुळे आता फायनलमध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका लीजंड्स सामन्यातल्या विजेत्याबरोबर भारतीय लीजंड्स खेळणार आहेत. गेल्या वर्षीही याच स्पर्धेत इंडिया लीजंड्सन विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे सलग दुसऱ्या विजेतेपदापासून सचिनचा संघ आता केवळ एक पाऊल दूर आहे.
सचिनचा ‘मास्टर क्लास’ सेमी फायनलमध्ये सचिनच्या बॅटमधून फारशा धावा निघाल्या नाहीत. तो केवळ 10 धावा काढून बाद झाला. पण ब्रेट लीच्या बॉलवर त्यानं खेचलेला चौकार जुन्या सचिनची आठवण करुन देणारा ठरला. सचिननं एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून केलेला हा पंच डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.
हेही वाचा - T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का ‘आऊट’ शनिवारी होणार मेगा फायनल रायपूरच्याच मैदानावर शनिवारी या स्पर्धेची फायनल रंगणार आहे. सचिनची इंडिया लीजंड्स या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचली असून श्रीलंका किंवा वेस्ट इंडिज यांच्या पैकी एक संघ फायनलमध्ये टीम इंडिया लीजंड्सशी भिडणार आहे. गेल्या वर्षी भारत आणि श्रीलंका संघात अंतिम सामना रंगला होता. त्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 14 धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदाही सचिनची टीम विजेतेपद पटकावणार की स्पर्धेत नवा विजेता मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.