रोहित शर्माची विक्रमी कामगिरी
सिडनी, 27 ऑक्टोबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्धच्या दणदणीत विजयानं सुरुवात केली. त्यानंतर आज भारतीय संघानं नेदरलँडचं आव्हानही मोडीत काढलं. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यात केएल राहुलचा अपवान वगळता टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीनं दमदार फलंदाजी केली. त्यात रोहित शर्मा फॉर्ममध्ये आला ही टीम इंडियासाठी समाधानाची बाब मानावी लागेल. रोहितनं या सामन्यात 53 धावांची खेळी केली. दरम्यान रोहितनं आज अर्धशतकी खेळी करुन टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगचा एक विक्रम मोडीत काढला. रोहितनं मोडला युवराजचा विक्रम टी20 वर्ल्ड कपमध्ये आता रोहित शर्मा भारताकडून सर्वात जास्त सिक्स ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्यानं आजच्या सामन्यात तीन सिक्स ठोकून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडीत काढला. रोहितच्या खात्यात आता 34 सिक्स जमा आहेत. याआधी युवराजनं टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक 33 सिक्स ठोकले होते. आता रोहित शर्माच्या गेलनंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलनं टी20 वर्ल्ड कपमध्ये 63 सिक्स मारले आहेत.
हेही वाचा - Ind vs Ned: टी20 वर्ल्ड कपचा एकच किंग! मेलबर्ननंतर सिडनीतही किंग कोहलीचा मोठा पराक्रम नेदरलँडचा धुव्वा दरम्यान सिडनीच्या मैदानात आज टीम इंडियानं नेदरलँडला 56 धावांनी धूळ चारली. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकांमुळे टीम इंडियानं 2 बाद 179 धावा उभारल्या. विराटनं नाबाद 62, सूर्यानं नाबाद 51 धावा केल्या. त्यानंतर 180 धावांचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँडला भारतीय गोलंदाजांनी फारशी संधीच दिली नाही. भारताच्या भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अश्विन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर शमीनं एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारनं तर टी20 क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकाच सामन्यात 2 ओव्हर मेडन टाकल्या.