रिचर्ड केटलब्रो
मेलबर्न, 06 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कप मधला खरा थरार अजून बाकी आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांनी सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे. येत्या बुधवार आणि गुरुवारी हे सेमी फायनलचे मुकाबले पार पडतील. या सेमी फायनलच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियात एका गोष्टीची भरपूर चर्चा होतेय. ती आहे एका अम्पायरसंदर्भात. टीम इंडियानं2013 पासून आतापर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. गेल्या 9 वर्षात आयसीसी च्या स्पर्धेत प्रत्येक वेळी महत्वाच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी ढासळते आणि भारत विजेतेपदापासून दूर राहतो. आणि या सगळ्यात एक साम्य म्हणजे बाद फेरी किंवा त्या महत्वाच्या सामन्यात अम्पायर म्हणून एक व्यक्ती सतत दिसते. ते म्हणडे इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रो. सेमी फायनलमध्ये नसणार केटलब्रो हेच रिचर्ड केटलब्रो भारत आणि इंग्लंड संघातल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये अम्पायरची भूमिका बजावणार नाहीत. याचं कारण केटलब्रो हे मूळचे इंग्लंडचे आहेत. आयसीसीच्या स्पर्धेत न्यूट्रल अम्पायर असल्यानं इंग्लंडच्या सामन्यात ते अम्पायरिंग करणार नाहीत. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पण खरोखरच रिचर्ड केटलब्रो टीम इंडियासाठी अनलकी आहेत का? टीम इंडिया आणि केटलब्रो 2014 साली आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियानं धडक मारली होती. फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना होता तो श्रीलंकेशी. पण श्रीलंकेनं फायनल जिंकून धोनीच्या टीम इंडियाला दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यापासून रोखलं. त्या सामन्यात ऑन फिल्ड अम्पायर होते रिचर्ड केटलब्रो.
त्यानंतर 2015 मध्ये आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मॅचमध्येही कुमार धर्मसेना यांच्यासह केटलब्रो ऑन फिल्ड अम्पायर होते. भारतानं ती सेमी फायनल 85 धावांनी गमावली.
2016 साली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली होती. वानखेडेवर झालेल्या त्या लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियाच्या 193 धावांच्या विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. त्याही वेळी वानखेडेवर इयान गुल्ड यांचे पार्टनर होते रिचर्ड केटलब्रो.
2017 मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली. विराट कोहलीची टीम इंडिया त्यावेळी विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. पण भारताला पाकिस्तानविरुद्धच्या त्या फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. योगायोगाची गोष्ट म्हणजे तेव्हाही इरॅस्मस यांच्या जोडीला मैदानात होते रिचर्ड केटलब्रो
2019 साली भारतीय चाहतेच नव्हे तर अख्खा भारतीय ड्रेसिंग रुम रडला. कारण सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून टीम इंडियाला हार स्वीकारावी लागली आणि वर्ल्ड कपची फायनल गाठण्याचं स्वप्न भंगलं. तेव्हा त्याही मॅचमध्ये केटलब्रोच अम्पायरिंग करत होते.
2021 मध्ये भारत पहिल्यावहिल्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचला. तेव्हा केटलब्रो ऑन फिल्ड अम्पायर नव्हते. पण त्यांनी त्या मॅचमध्ये थर्ड अम्पायरची भूमिका बजावली होती. भारतानं शेवटच्या दिवशी ती फायनल मॅच गमावली होती.
2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये केटलब्रोंनी टीम इंडियाची पाठ सोडली नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर सुपर 12 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची महत्वाची लढत होती. त्या मॅचमध्ये केटलब्रो आणि इरॅस्मस हीच जोडी होती. दुर्दैवानं भारतानं तोही सामना गमावला आणि सुपर 12 मधूनच भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
सेमी फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान दरम्यान टीम इंडिया आता वर्ल्ड कपपासून अवघी दोन पावलं दूर आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघात दुसरा सेमी फायनलचा मुकाबला रंगणार आहे. अॅडलेड ओव्हलवर ही मॅच खेळवली जाईल. सुदैवाची बाब ही की केटलब्रो इंग्लंडचेच असल्यानं त्या मॅचमध्ये ते अम्पायरिंग करणार नाहीत. त्यामुळे सेमी फायनलपुरता तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी निश्वास टाकला असेल.