न्यूझीलंडची श्रीलंकेवर मात
सिडनी, 29 ऑक्टोबर: सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज श्रीलंकेला एक कॅच चांगलच महागात पडलं. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडनं सुपर 12 फेरीतल्या ग्रुप 1 च्या सामन्यात श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. या सामन्यात ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडनं 20 ओव्हरमध्ये 7 बाद 167 धावा केल्या. पण त्यानंतर श्रीलंकेचा डाव 102 धावात आटोपला. या विजयासह न्यूझीलंडनं टीम ग्रुप 1 मधून सेमी फायनलसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. न्यूझीलंडचा गेल्या 3 सामन्यातला हा दुसरा विजय ठरला. तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. त्यामुळे 5 पॉईंटसह न्यूझीलंड ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थानावर आहे. बोल्टची कमाल, श्रीलंकेचा धुव्वा 168 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवातही अतिशय खराब झाली. ट्रेन्ट बोल्ट आणि टीम साऊदीच्या आक्रमणासमोर श्रीलंकेचे पहिले चार बॅट्समन अवघ्या 8 धावात पॅव्हेलियनमध्ये परतले. पण त्यानंतर राजपक्षे (34) आणि कॅप्टन दसुन शनाकानं (35) थोडी झुंज दिली. पण ते दोघंही बाद झाले आणि श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. ट्रेन्ट बोल्टनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ईश सोधी आणि मिचेल सँटनरनं प्रत्येकी दोन तर साऊदी आणि फर्ग्युसननं एकेक विकेट घेतली.
ग्लेन फिलिप्सचं शतक ग्लेन फिलिप्स हा न्यूझीलंडसाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरला. कारण 3 बाद 15 वरुन फिलिप्सनं न्यूझीलंडला 7 बाद 167 पर्यंत पोहोचवलं. त्यानं यंदाच्या वर्ल्ड कपमधलं दुसरं शतकही ठोकलं. फिलिप्सनं 64 बॉलमध्ये 104 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पण याच खेळीदरम्यान फिलिपला जीवदानही मिळालं आणि त्याचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला. हेही वाचा - Ind vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस? पाहा रविवारच्या मॅचआधी Weather Report श्रीलंकेला एक कॅच पडलं महागात श्रीलंकन गोलंदाजांनी या सामन्याला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. तीक्षणा, धनंजय आणि रजिथानं न्यूझीलंडच्या आघाडीच्या फिन अॅलन, कॉनवे आणि कॅप्टन विल्यमसन या महत्वाच्या खेळाडूंना माघारी धाडलं होतं. त्याचवेळी अनुभवी गोलंदाज हसरंगानं श्रीलंकेला एक मोठी संधी निर्माण करुन दिली होती. हसरंगाच्या बॉलंगवर फिलिप्सचा लाँग ऑफला उडालेला सोपा कॅच निसंकानं सोडला. आणि त्यानंतर मात्र फिलिप्सनं याचा पुरेपूर फायदा उठवत थेट शतकच ठोकलं. फिलिप्सनं टी20 कारकीर्दीतलं हे दुसरं शतक ठरलं. त्यानं याआधी 2020 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 108 धावांची खेळी केली होती.