न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियावर मात
सिडनी, 22 ऑक्टोबर: केन विल्यम्सनच्या न्यूझीलंड संघानं आपल्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच्या सुपर 12 फेरीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 89 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात किवी संघानं मोठा धक्का दिला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं पारडं सामन्याआधी तुलनेत जड वाटत होतं. सामन्याचा टॉसही ऑस्ट्रेलियानंच जिंकला. पण केवळ त्या एकाच गोष्टीचा अपवाद वगळता न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रत्येक विभागात अव्वल राहिला. कांगारुंची दाणादाण या सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण 201 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची न्यूझीलंडसमोर दाणादाण उडाली. आणि कांगारुंचा डाव 17.1 ओव्हरमध्येच 111 धावात आटोपला. न्यूझीलंडकडून टिम साऊथी आणि मिचेल सँटनरनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्टनं 2 विकेट घेतल्या. महत्वाचं म्हणजे गेल्या 11 वर्षात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियात जिंकलेला हा पहिलातच टी20 सामना ठरला.
किवी संघाची दमदार सुरुवात सिडनीतल्या या सामन्यात गतवेळचे विजेते आणि उपविजेते सुपर 12 फेरीच्या पहिल्याच सामन्यात आमनेसामने आले होते. पण यावेळी न्यूझीलंड एका वेगळ्याच आत्नविश्वासानं मैदानात उतरली होती. युवा सलामीवीर फिन अॅलन आणि डेवॉन कॉनवेनं न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. अॅलननं पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं दोन फोर आणि एका सिक्ससह 14 धावा वसूल केल्या. त्यानंतर अॅलननं हेजलवूड, कमिन्स आणि स्टॉयनिसच्या गोलंदाजीवरही हल्ला चढवला. हेजलवूडच्या बॉलवर आऊट होण्यापूर्वी त्यानं अवघ्या 16 बॉल्समध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 42 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीमुळे न्यूझीलंडनं पहिल्या सहा ओव्हरमध्ये म्हणजेच पॉवरप्लेमध्ये 1 बाद 65 धावा केल्या.
हेही वाचा - T20 World Cup: 0,4,6,0,4,0… किवी टीमच्या ‘या’ प्लेयरनं सुपर-12 फेरीची केली दणक्यात सुरुवात, Video कॉनवेची नाबाद खेळी गेल्या वर्षभरात डेवॉन कॉनवे हे नाव न्यूझीलंड क्रिकेटमध्ये चांगलच गाजतंय. याच कॉनवेनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अॅलन (42), कॅप्टन विल्यमसन (23) आणि जिमी निशामसोबत (26*) मोठ्या भागीदाऱ्या केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 3 बाद 200 धावांचा डोंगर उभारता आला. कॉनवेनं 58 बॉल्समध्ये 7 फोर आणि 2 सिक्सर्ससह नाबाद 92 धावांची खेळी केली.