मुंबई, 3 फेब्रुवारी : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अनेकदा विविध गोष्टींनी आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्र सिंह धोनी निवृत्त झाला असला तरी चाहत्यांमधील त्याची क्रेज अजूनही कमी झालेली नाही. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो व्हायरल होत असून यात धोनी पोलिसांच्या वेशात दिसत आहे. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यांनंतर एम एस धोनी मनोरंजन सृष्टीकडे वळला असून लवकरच त्याच्या धोनी इंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तामिळ चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अशातच धोनीचा पोलीस वेशातील फोटो व्हायरल झाल्यामुळे धोनी आता सिनेमा निर्मिती सह अभिनय क्षेत्राकडे देखील वळला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला.
व्हायरल फोटोमध्ये पोलिसांच्या वेशात धोनी अतिशय डॅशिंग आणि हँडसम दिसत असल्याने नेटकरी त्याच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. अनेकांनी त्याची तुलना सिंघम मधील अजय देवगण आणि सिंबा चित्रपटात पोलिसांची भूमिका करणाऱ्या रणवीर सिंह सोबतही केली आहे.
परंतु धोनीने ही भूमिका चित्रपटासाठी नाही तर एका जाहिरातीसाठी केली होती. नुकतेच धोनीने या जाहिरातीचे शूटिंग केले असून यात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.