मुंबई, 3 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटर रविकांत शुक्ला हा सध्या फसवणुकीचा बळी ठरला आहे. रविकांत याची सुमारे 71 लाख रुपयांची फसवणूक झाली असून त्याने या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र या तक्रारीनंतर रविकांतला त्याच्या कुटुंबासहित जीवे मारण्याची धमकी मिळत आहे . रविकांत शुक्ला याने 2006 रोजी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. सध्याचे आघाडीचे क्रिकेटपटू कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, पियुष चावला इत्यादी खेळाडू रविकांतच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर 19 संघात खेळले आहेत. रविकांत शुक्लाने याजदान बिल्डरविरोधातवर 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. क्रिकेटपटूने हजरतगंज पोलिस ठाण्यात याजदान बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार याजदान बिल्डरकडून रविकांत याने अपार्टमेंट विकत घेतले होते. त्यावेळी या अपार्टमेंटचे बांधकाम एलडीएच्या नियमांनुसार वैध असल्याचे बिल्डरने सांगितले. परंतु नंतर हे अपार्टमेंट बेकायदा जमिनीवर बांधल्याचे निष्पन्न झाल्यामुळे एलडीएने डिसेंबरमध्ये अपार्टमेंट बेकायदेशीर ठरवून जमीनदोस्त केले. क्रिकेटपटू रविकांत शुक्ला याने याजदान बिल्डरकडून त्याचे 71 लाख रुपये परत करण्याची मागणी केली. यामुळे त्याला त्याच्या कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर क्रिकेटपटूने पोलिसांत धाव घेऊन संबंधित बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
35 वर्षीय भारतीय क्रिकेटर रविकांत शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रहिवासी आहे. हजरतगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अखिलेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, याजदान बिल्डरच्या प्राग नारायण रोड अलया हेरिटेज अपार्टमेंटमध्ये रविकांतने दोन फ्लॅट बुक केले होते असे रविकांतने तक्रारीत म्हंटले आहे. 7 जणांनी आपली फसवणूक करून 71 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप रविकांतने केला आहे. हे प्रकरण पुढे कोणते वळणं घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.