भारत वि. बांगलादेश
अॅडलेड, 02 नोव्हेंबर: रोहित शर्माची टीम इंडिया यंदा ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे ती दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. टीम इंडियाचं सध्या वर्ल्ड कपचं तिकीट कन्फर्म मानलं जातंय. पण याचदरम्यान भारतीय संघातल्या एका खेळाडूच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. तो खेळाडू आहे टीम इंडियाचा उपकर्णधार लोकेश राहुल. लोकेश राहुलला पहिल्या तीन सामन्यात दुहेरी धावांचा आकडाही पार करता आला नव्हता. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन चिंतेत होतं. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी राहुलनं नेट्समध्ये भरपूर सराव केला. यावेळी सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीनंही त्याला मार्गदर्शन केलं. आणि आज विराटची ती मेहनत फळाला आली. बांगलादेशविरुद्ध राहुलचं अर्धशतक पहिल्या तीन सामन्यात केवळ 22 धावा करणाऱ्या राहुलनं आज बांगलादेशविरुद्ध आत्मविश्वासानं सुरुवात केली. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या राहुलनं बॉलवर नजर बसतान गियर बदलला आणि बांगलादेशी बॉलर्सवर आक्रमण केलं. त्यानं 32 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्सर्ससह 50 धावा फटकावल्या. यावेळी नॉन स्ट्राईक एन्डला असलेल्या विराटनं राहुलचं कौतुकही केलं.
विराटचा सुपर फॉर्म कायम राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं पुन्हा एकदा टीम इंडियासाठी मोठी इनिंग केली. मेलबर्न, सिडनी आणि त्यानंतर आज अॅडलेडमध्ये विराटनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 44 बॉलमध्ये 8 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 64 धावांची खेळी केली. अॅडलेड मैदान विराट कोहलीसाठी पुन्हा एकदा लकी ठरलं. याच मैदानात त्यानं झळकावलेलं हे तीन सामन्यातलं दुसरं अर्धशतक ठरलं.
टीम इंडियाचा धावांचा डोंगर दरम्यान विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावांचा डोंगर उभारता आला. या दोघांशिवाय सूर्यकुमार यादवनंही 30 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा मात्र 2 धावा काढून तंबूत परतला. तर हार्दिक पंड्या (6), अक्षर पटेल (7) आणि दिनेश कार्तिक (7) यांनही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण शेवटच्या ओव्हरमध्ये अश्विननं मात्र फटकेबाजी केली. त्यानं 1 फोर आणि 1 सिक्ससह 13 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन मेहमूदनं 3 तर कॅप्टन शाकिब अल हसननं 2 विकेट्स घेतल्या.