मुंबई, 30 नोव्हेंबर : फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये एखाद्या देशाने सामना जिंकला तर त्या देशाचे नागरिक जल्लोष करतात. ही खरंतर देशवासियांची सामान्य प्रतिक्रिया आहे. मात्र ईराणला अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ईराणी नागरिकांनी सेलिब्रेशन केलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या फुटबॉल सामन्यात अमेरिकेनं ईराणला पराभूत केलं. त्यानतंर ईराणी नागरिकांना जल्लोष केला. फुटबॉल सामन्यात आपल्याच संघाच्या पराभवानंतर हे लोक सेलिब्रेशन करत आहेत. यामागे कारण आहे ते महसा अमीनीच्या मृत्यूनंतर सुरू असलेलं आंदोलन. सोशल मीडियावर सामन्यात पराभव झाल्यानतंर सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येनं लोक जल्लोष करताना दिसतात. हेही वाचा : अय्यरने धवन, कोहलीलासुद्धा टाकले मागे; शिवाय नकोसं रेकॉर्डही नावावर
विशेष म्हणजे ईराणच्या संघाच्या पराभवानंतर ट्विटरवर जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये लोक रस्त्यावर डान्स करताना दिसतायत. याशिवाय टायर्सही जाळल्या आहेत. तसंच जोरजोरात ओरडतानाही ऐकू येत आहे. हेही वाचा : पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये महिला रेफ्री? फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांच ‘हे’ घडणार
ईराणमध्ये 22 वर्षांच्या महसा अमीनीचा हिजाब वादात पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर ईराणसह जगभरात याची चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून ईराणमध्ये नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यूही झाला आहे. आंदोलकांनी फिफा वर्ल्ड कपमध्ये आपल्या संघाला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. यानंतरही सरकारने संघाला फिफामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं. यावर अनेक देशांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. ईराणच्या फुटबॉल संघानेसुद्धा फिफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यावेळी महसा अमीनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ राष्ट्रगित गाण्यास नकार दिला होता. 22 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध ईराणचा पहिला सामना होता. दोन्ही देशांच्या खेळाडुंना आपआपल्या देशाचं राष्ट्रगित गायचं होतं. मात्र ईराणी खेळाडूंनी राष्ट्रगित गायलं नाही.