मुंबई, 10 डिसेंबर : बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने गमावली असली तरी अखेरच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. इशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 409 धावांचा डोंगर उभा केला. त्यानतंर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या बांगलादेशला 182 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशने तीन सामन्यांपैकी पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. बांगलादेशच्या 29.4 षटकात 9 बाद 149 धावा झाल्या होत्या. 10 व्या गड्यासाठी टस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान यांनी 33 धावांची भागिदारी केली. टस्कीन अहमदने 17 तर मुस्तफिजूर रहमानने 13 धावा केल्या. मुस्तफिजूरचा त्रिफळा उडवून उम्रान मलिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेही वाचा : इशान किशनने द्विशतकासह केले अनेक विक्रम, सचिन-रोहितलासुद्धा टाकलं मागे बांगलादेशकडून सर्वाधिक 43 धावांची खेळी शाकिब अल हसनने केली. तर लिट्टन दासने 26 चेंडूत 29 धावा काढत फटकेबाजीचा प्रयत्न केला. तर यासिर अलीने 25 आणि महमुदुल्लाहने 20 धावांची खेळी केली. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या शार्दुल ठाकूरने तीन, अक्षर पटेल, उम्रान मलिक यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हेही वाचा : विराटने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सचिननंतर अशी कामगिरी करणारा दुसरा तत्पूर्वी, भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली होती. शिखर धवन अवघ्या तीन धावा काढून बाद झाला. मात्र त्यानंतर इशान किशन आणि विराट कोहली यांनी 290 धावांची भागिदारी केली. इशान किशन 210 धावांची झंझावाती द्विशतकी खेळी करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनेसुद्धा शतक साजरं केलं. इशान किशननंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोघेही स्वस्तात बाद झाले. त्यानतंर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने 27 चेंडूत 37 धावांची वेगवान खेळी केली. तर अक्षर पटेलनेसुद्धा 1 चौकार आणि 1 षटकार मारत 17 चेंडूत 20 धावा केल्या. भारताने 50 षटकात 8 बाद 409 धावा केल्या.