श्रेयस अय्यर, ईशान किशन
रांची, 9 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची वन डेत टीम इंडियानं 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या युवा फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली 161 धावांची भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. अय्यर आणि ईशानच्या स्फोटक फलंदाजीनं 279 धावांचं टारगेट भारताला 46व्या ओव्हरमध्येच गाठून दिलं. श्रेयस अय्यरनं या सामन्यात वन डे कारकीर्दीतलं आपलं दुसरं शतक पूर्ण केलं. पण ईशान किशननं आपल्या होम ग्राऊंडवर इतक्या चांगल्या खेळीनंतरही एक छोटीशी चूक केली आणि याच चुकीमुळे त्याचं पहिलंवहिलं वन डे शतक हुकलं. ईशान-अय्यरचा धमाका रांचीत दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 279 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण शुभमन गिल आणि कॅप्टन शिखर धवन ही सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरली. गिल 28 तर धवन 13 धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर टीम इंडियाच्या डावाची सगळी सूत्र ईशान आणि श्रेयस या जोडीनं आपल्या हातात घेतली. झारखंडकडून खेळणाऱ्या ईशान किशनचं रांची हे होम ग्राऊंड. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यानं आपल्या भात्यातले एकेक फटके बाहेर काढले.
पण ईशान शतक करणार असं वाटत असतानाच डावखुऱ्या बिऑन फॉर्च्युनच्या एका खाली राहणाऱ्या बॉलिंगवर तो फसला. पूल करण्याच्या प्रयत्नात ईशानचा फटका थेट डीप स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात गेला. ईशाननं 84 बॉलमध्ये तब्बल 7 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीनं 93 धावा केल्या. आऊट झाल्यानंतर ईशानच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे जाणवत होती.
ईशान बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं संजू सॅमसनच्या साथीनं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. श्रेयसनं आपल्या वन डे कारकीर्दीतल्या दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. त्यानं 111 बॉल्समध्ये नाबाद 113 धावांची खेळी केली.
मारक्रम, हँड्रिक्सची अर्धशतकं त्याआधी टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन केशव महाराजनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं 50 ओव्हरमध्ये 7 बाद 278 धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हँड्रिक्स, एडन मारक्रम यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. हँड्रिक्सनं 74 तर मारक्रमनं 79 धावांचं योगदान दिलं. याशिवाय मिलरनं नाबाद 35 आणि क्लासेननं 30 धावांची भर घातली. भारताकडून मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव आणि पदार्पण करणारा शाहबाज अहमदनं एक विकेट घेतली.
हेही वाचा - Ind vs SA ODI: टॉस करायचा आहे, पण कॉईन कुठे? सामन्याआधी घडला हा मजेशीर किस्सा, धवननं घेतली मजा नवी दिल्लीत निर्णायक लढत लखनौची पहिली वन डे भारतानं 9 धावांनी गमावली होती. पण रांचीत मात्र टीम इंडियानं त्या पराभवाचा वचपा काढताना 7 विकेट्सनी विजय साजरा केला. दरम्यान टीम इंडियानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधल्यानं नवी दिल्लीतला पुढचा मुकाबला निर्णायक ठरणार आहे. मंगळवारी 11 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे.