रांची, 9 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या रांची वन डेदरम्यान आज एक मजेशीर घटना घडली. ज्याची सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. आजच्या सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवन आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन केशव महाराज मैदानात आले. कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी यांनी दोन्ही कॅप्टन आणि सामनाधिकारी जावगल श्रीनाथ यांचा परिचय करुन दिला आणि त्यानंतर यजमान संघाच्या कॅप्टनला म्हणजेच शिखर धवनला टॉस करण्याची विनंती केली. पण त्याचवेळी शिखर धवननं श्रीनाथ यांच्याकडे पाहिलं आणि श्रीनाथ यांना आपली चूक लक्षात आली. जेव्हा श्रीनाथ कॉईन द्यायला विसरतात… त्याचं झालं असं की टॉसवेळी सामनाधिकारी जावगल श्रीनाथ शिखर धवनकडे कॉईन द्यायला विसरले. संजय मांजरेकर यांनी धवनला टॉस करण्यास सांगितलं तेव्हा धवनकडे कॉईनच नव्हता. धवननं श्रीनाथ यांच्याकडे पाहिलं. त्यावेळी श्रीनाथ यांनी पटकन आपल्या खिशातील कॉईन काढून धवनच्या हातात दिला. यादरम्यान धवन आणि केशव महाराज दोघांनीही हसत हसत श्रीनाथ यांची मजा घेतली. टॉसचा व्हिडीओ जेव्हा बीसीसीआयनं शेअर केला तेव्हा मजेशीर किस्सा सोशल मीडियातही व्हायरल झाला.
🚨 Toss Update from Ranchi 🚨
— BCCI (@BCCI) October 9, 2022
South Africa have elected to bat against #TeamIndia in the second #INDvSA ODI.
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKiAHZ @mastercardindia pic.twitter.com/NKjxZRPH4e
दक्षिण आफ्रिकेची दमदार बॅटिंग दरम्यान टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन केशव महाराजनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं 50 ओव्हरमध्ये 7 बाद 278 धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हँड्रिक्स, एडन मारक्रम यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. हँड्रिक्सनं 74 तर मारक्रमनं 79 धावांचं योगदान दिलं. याशिवाय मिलरनं नाबाद 35 आणि क्लासेननं 30 धावांची भर घातली. भारताकडून मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव आणि पदार्पण करणारा शाहबाज अहमदनं एक विकेट घेतली.