भारत वि. बांगलादेश
अॅडलेड, 02 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं आणखी एका दणदणीत विजयाची नोंद केली. टीम इंडियानं अॅडलेडच्या मैदानात बांगलादेचा डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी पराभव केला. भारतीय संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपच्या मैदानातला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळे टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. तर दुसऱ्या नंबरवर दक्षिण आफ्रिका आहे. सुपर 12 फेरीच्या ग्रुप 2 मध्ये सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे सामने बाकी आहेत. तर टीम इंडिया पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा सेमी फायनलमधला प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
पावसाचा व्यत्यय या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण सामन्यादरम्यान या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यावेळी लिटन दास (60) च्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशनं बिनबाद 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर बांगलादेशला 16 ओव्हरमध्ये 151 असं सुधारित टार्गेट मिळालं. पण पावसानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जादू केली. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीनं प्रभावी मारा करताना बांगलादेशी संघाला रोखून धरलं. तरीही नरुल हसननं फटकेबाजी करुन मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नेली. पण अखेरच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगनं 20 धावा हव्या असताना टिच्चून मारा केला. त्यामुळे सामना भारतीय संघाच्या बाजूनं झुकला.
टीम इंडियाचा धावांचा डोंगर दरम्यान त्याआधी विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावांचा डोंगर उभारता आला.
या दोघांशिवाय सूर्यकुमार यादवनंही 30 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा मात्र 2 धावा काढून तंबूत परतला. तर हार्दिक पंड्या (6), अक्षर पटेल (7) आणि दिनेश कार्तिक (7) यांनही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण शेवटच्या ओव्हरमध्ये अश्विननं मात्र फटकेबाजी केली. त्यानं 1 फोर आणि 1 सिक्ससह 13 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन मेहमूदनं 3 तर कॅप्टन शाकिब अल हसननं 2 विकेट्स घेतल्या.