मार्क वुड, मलान फायनलसाठी फिट?
मेलबर्न, 12 नोव्हेंबर: इंग्लंड आणि पाकिस्तान संघ यंदाच्या टी20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी सज्ज झाले आहेत. बाबर आझम आणि जोस बटलरच्या नेतृत्वात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुमारे 90 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम फेरीचा हा सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं संकट मात्र कायम आहे. पण याच दरम्यान इंग्लंडच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर पाकिस्तानी संघासाठी हीच बाब धोक्याची घंटा ठरु शकते. कारण भारताविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये न खेळलेले इंग्लंडचे दोन शिलेदार पुन्हा फिट झाले आहेत आणि त्यांनी आज नेट्समध्ये बराचवेळ सरावही केला. त्यामुळे फायनलमध्ये ते दोघंही खेळणार असल्याची दाट शक्यता आहे. मार्क वुड फायनलमध्ये खेळणार? मार्क वुड हा यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडसाठी हुकमी एक्का ठरला. पण भारताविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला खेळता आलं नाही. पण तरीही इंग्लिश संघानं जोस बटलर आणि हेल्सच्या दमदार खेळीमुळे फायनलचं तिकीट पटकावलं. पण आता फायनलसाठी मार्क वुड फिट झाल्याचं दिसतंय. त्यानं नेट्समध्ये आज बराच वेळ सराव केला. त्यानंतर बीबीसीला प्रतिक्रिया देताना म्हटलंय की फायनलसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याचा त्याचा पुरेपूर प्रयत्न राहील. या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वुडनं 4 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा - T20 World Cup: पराभवानंतर मैदानातच रोहित रडला, पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पाहा काय काय घडलं? डेव्हिड मलानही फिट? दरम्यान इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मलानही फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास इंग्लिश संघाचं पारडं पाकिस्तानविरुद्ध थोडं वरचढ ठरेल. मलाननंही आज नेट्समध्ये सराव केला. सुपर 12 फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सेमी फायनलमध्येही त्याला खेळता आलं नाही. पण फायनलमध्ये मार्क वुड आणि मलान इंग्लंड संघात परतले तर इंग्लंडची बाजू भक्कम होईल.
मेलबर्नमध्ये पाऊस घालणार गोंधळ मेलबर्नमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत इथे खेळवण्यात आलेले वर्ल्ड कपचे तीन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. त्यात फायनलमध्येही पाऊस बरसण्याची शक्यता असल्यानं चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. फायनलसाठी तब्बल 90 हजार प्रेक्षक एमसीजीवर उपस्थित राहणार आहेत. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी पाऊस पडण्याची शक्यता 95 टक्के इतकी आहे. रविवारी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.