दिनेश कार्तिकचा अचूक निर्णय
पर्थ, 30 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या सुपर 12 फेरीच्या लढतीत दिनेश कार्तिकचा एक निर्णय टीम इंडियाच्या फायद्याचा ठरला. भलेही कार्तिकनं आज बॅटिंगमध्ये कमाल दाखवली नाही पण त्यानं स्टम्प्सच्य मागे राहून टीम इंडियाला एक विकेट मिळवून दिली तीही दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसो या धोकादायक बॅट्समनची. रुसो अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर लेग बिफोर विकेट पद्धतीनं आऊट झाला. त्यासाठी रोहितला रिव्ह्यू घ्यावा लागला पण त्यावेळी मैदानात छोटासा ड्रामा पाहायला मिळाला. कार्तिकच्या हट्टामुळे मिळाली विकेट अर्शदीप सिंगनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पुन्हा एकदा विकेटनं आपल्या स्पेलची सुरुवात केली. त्यानं दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉकला बाद करत पहिला धक्का दिला. याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर अर्शदीपनं यंदाच्या वर्ल्ड कपमधला पहिला शतकवीर रायली रुसोला एलबीडब्ल्यू पकडलं. पण अपीलनंतर अम्पायर्सनी त्याला नॉट आऊट दिली. डीआरएससाठी जेव्हा रोहितनं अर्शदीपला विचारलं तेव्हा त्यानं बॉल बाहेर जातोय असं सांगितलं. पण दिनेश कार्तिकनं रोहितशी यादरम्यान चर्चा केली आणि डीआरएस घेण्याचा आग्रह धरला. रोहित हा डीआरएस घेण्यासाठी राजी नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत नव्हतं. पण टायमर थांबण्याआधी त्यानं कार्तिकचं म्हणणं मान्य केलं.
रुसो आऊट, कार्तिक राईट अखेर थर्ड अम्पायरच्या रिव्ह्यूमध्ये बॉल थेट स्टम्पला लागत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आणि अम्पायरनं रुसोला बाद ठरवलं. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला आणि कार्तिकला दाद दिली.