चेतेश्वर पुजारा
राजकोट, 01 ऑक्टोबर: टीम इंडियाचा कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारानं यंदाच्या काऊंटी सीझनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. पुजाराच्या या कामगिरीमुळे जुलैमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी त्याचं टीममध्ये कमबॅकही झालं. त्यानंतर रॉयल लंडन वन डे कपमध्येही पुजारानं लागोपाठ शतकं ठोकली. पण हाच पुजारा भारतात परतला आणि मोसमातल्या पहिल्यात सामन्यात मात्र फेल ठरला. आजपासून राजकोटमध्ये इराणी ट्रॉफीच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात 2019-20 सालच्या रणजी विजेत्या सौराष्ट्रचा डाव पहिल्याच सत्रात आटोपला. पुजारा स्वस्तात माघारी इराणी ट्रॉफीत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या सौराष्ट्रची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या 10 ओव्हरमध्येच सौराष्ट्रचा निम्मा संघ 30 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. सौराष्ट्रकडून खेळणारा टीम इंडियाचा कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा पहिल्या डावात अवघ्या एका धावेवर माघारी परतला. तर रेस्ट ऑफ इंडियाच्या जबरदस्त आक्रमणासमोर इतर फलंदाजांना फारवेळ खेळपट्टीवर टिकता आलं नाही. सौराष्ट्रचे सहा फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. त्यामुळे सौराष्ट्रचा डाव पहिल्याच सत्रात 24.4 ओव्हरमध्ये अवघ्या 98 धावातच आटोपला. रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमारनं 4, उमरान मलिकनं 3 आणि कुलदीप सेननंही तीन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा - MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची नवी इनिंग? पण क्रिकेटच्या मैदानात नाही, तर…
पुजारा काऊंटी क्रिकेटमध्ये हीरो
टीम इंडियाच्या कसोटी टीममधून बाहेर पडल्यानंतर पुजारानं आपला मोर्चा काऊंटी क्रिकेटकडे वळवला तिथे त्यानं 8 सामन्यांमध्ये 1094 धावांचा पाऊस पाडला. त्यात दोन द्विशतकांसह 5 शतकांचा समावेश होता. या कामगिरीच्या जोरावर पुजाराला भारतीय कसोटी संघात पुन्हा जागा मिळाली. त्यानंतर झालेल्या रॉयल लंडन वन डे कपमध्येही पुजाराची बॅट तळपली. पुजारानं 9 मॅचमध्ये 3 शतकं आणि 2 अर्धशतकांसह 624 धावांचा रतीब घातला. त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुजारा दुसऱ्या क्रमांकावर होता.