मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची नवी इनिंग? पण क्रिकेटच्या मैदानात नाही, तर...

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची नवी इनिंग? पण क्रिकेटच्या मैदानात नाही, तर...

धोनी आणि कपिल देव

धोनी आणि कपिल देव

MS Dhoni: काही दिवसांपूर्वी विम्बल्डन आणि त्यानंतर अमेरिकन ओपन टेनिसचा आनंद लुटतानाही आपण धोनीला पाहिला. हाच धोनी आता आणखी एका खेळाकडे वळला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 30 सप्टेंबर: महेंद्रसिंग धोनी... टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीनं आयसीसीच्या तीन मोठ्या इव्हेंट्समध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिलं आहे. 2007 चा टी20 वर्ल्ड कप, 2011 चा वन डे वर्ल्ड कप आणि 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी. तिन्ही स्पर्धा जिंकण्यामागचं महत्वाचं कारण होतं धोनीचं नेतृत्व कौशल्य. 2020 साली धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. पण तरीही त्याचं खेळावरचं प्रेम कमी झालेलं नाही. तो सध्या केवळ आयपीएलमध्ये खेळत असला तरी इतर खेळांमध्येही त्याला रुची आहे. काही दिवसांपूर्वी विम्बल्डन आणि त्यानंतर अमेरिकन ओपन टेनिसचा आनंद लुटतानाही आपण धोनीला पाहिला. हाच धोनी आता आणखी एका खेळाकडे वळला आहे आणि आज तो खेळतानाही दिसला.

गोल्फ कोर्सवर धोनी

निमित्त होतं कपिल देव-ग्रांट थ्रॉन्टन इन्व्हिटेशनल गोल्फ टूर्नामेंटचं. हरियाणातल्या गुरुग्राममध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारताचे विश्वविजेते महान कर्णधार कपिल देव यांच्यासह धोनीनंही या स्पर्धेत उपस्थिती लावली. धोनीनं यावेळी गोल्फ खेळण्याचा आनंदही लुटला. धोनाचा गोल्फ खेळतानाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कपिल देवही सध्या अनेक व्यावसायिक गोल्फ स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे धोनीनंही क्रिकेटनंतर आता गोल्फमध्येही आपली नवी इनिंग सुरु केली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

हेही वाचा - T20 World Cup: 'हा' IPL स्टार ऑस्ट्रेलियाला जाणार? स्टँड बाय खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता

धोनी पुन्हा दिसला गोल्फ कोर्सवर

महेंद्रसिंग धोनी गोल्फ खेळतानाची ही पहिलीच वेळ नाहीय. तर याआधीही 2019 साली धोनी एका स्पर्धेत सहभागी झाला होता. ती धोनीची पहिलीच गोल्फ टूर्नामेंट होती.

धोनीच्या हस्ते विजेत्याचा सन्मान

कपिल देव-ग्रांट थ्रॉन्टन इन्व्हिटेशनल गोल्फ टूर्नामेंटमध्ये यंदा अहमदाबादच्या वरुण पारेखनं बाजी मारली. 24 वर्षांच्या वरुणनं यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच PGTI क्वालिफाईंग स्पर्धा जिंकली होती. तर गेल्याच महिन्यात त्यानं PGTI मध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम तिसरं स्थान पटकावलं होतं. वरुणनं हाच फॉर्म कायम राखताना गुरुग्रामच्या स्पर्धेतही बाजी मारली. बक्षिस स्वरुपात वरुणला 15 लाख रुपये देण्यात आले. तर धोनीनं त्याला जॅकेट घालून सन्मानित केलं. या स्पर्धेत गुरुग्रामच्या मनू गंडासनं दुसरं तर कार्तिक शर्मानं तिसरं स्थान पटकावलं.

First published:

Tags: Cricket news, Golf champion, MS Dhoni