अर्शदीप सिंगनं केली कमाल
मेलबर्न, 23 ऑक्टोबर: टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कप मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे. रोहित शर्मानं महामुकाबल्यात टॉस जिंकून खरं तर अर्धी लढाई जिंकल्याचं स्पष्ट झालं. कारण गेले काही दिवस मेलबर्नमध्ये पाऊस पडतोय. अशा वातावरणात टॉस जिंकून कुठलीही टीम बॉलिंग करण्याचा निर्णय घेते कारण बॉलर्ससाठी ही परिस्थिती अनुकूल मानली जाते. त्यामुळे रोहितनंही टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचान निर्णय घेतला आणि भारतीय बॉलर्सनी आपल्या कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपनं टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली. अर्शदीपची पहिल्याच बॉलवर कमाल भुवनेश्वर कुमारनं मेलबर्नच्या मैदानात पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्यानं वाईडच्या रुपात एकच धाव दिली. पण त्यानंतर आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळत असलेल्या 23 वर्षांच्या अर्शदीप सिंगनं कमाल केली. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला माघारी धाडलं. अर्शदीपचा टप्पा पडून आत येणारा बॉल बाबरच्या पॅडवर जाऊन धडकला आणि तो जाळ्यात अडकला. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अर्शदीपनं पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना जगातला नंबर वन टी20 बॅट्समन मोहम्मद रिझवानला माघारी धाडलं. त्यामुळे पाकिस्तानी संघाची पहिल्या 4 ओव्हरमध्येच दाणादाण उडाली.
2021 च्या वर्ल्ड कपचा रिकॅप? 2021 साली यूएईतल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं अशाच प्रकारे भारतीय संघाची दाणादाण उडवली होती. त्यावेळी रोहित शर्मा गोल्डन डकचा शिकार झाला होता. त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीची विकेट घेत शाहीन आफ्रीदीनं टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं होतं. पण आज उलटं घडलं. आज अर्शदीपनं कमाल केली आणि आधी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला बाद केलं आणि मग रिझवानची विकेट काढून टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठं यश मिळवून दिलं.