अजिंक्य रहाणे
मुंबई, 29 सप्टेंबर: टीम इंडियाचा कसोटी स्पेशालिस्ट बॅट्समन अजिंक्य रहाणे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. याच वर्षी दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मात्र रहाणेनं या सीझनची चांगली सुरुवात केली आहे. सीझनच्या पहिल्याच स्पर्धेत म्हणजेच दुलीप ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेनं द्विशतकी खेळी केली. रहाणेच्याच नेतृत्वात याच स्पर्धेत वेस्ट झोननं साऊथ झोनचा पराभव करुन विजेतेपदही पटकावलं. त्यामुळे आता मुंबई क्रिकेट असोसिएशननं रहाणेकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. रहाणे मुंबईचा टी20 कॅप्टन आगामी सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेसाठी एमसीएनं अजिंक्य रहाणेच्या हाती कर्णधारपदाची सूत्र दिली आहेत. गेल्या वर्षी मुंबईचा संघ पृथ्वी शॉच्या नेतृत्वात या स्पर्धेत उतरला होता. पण यंदा मुंबई क्रिकेट असोसिएशननं या स्पर्धेत अनुभवी अजिंक्य रहाणे नेतृत्व करेल असं जाहीर केलं आहे. त्यासोबतच एमसीएनं 15 सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. हेही वाचा - Sachin Tendulkar: सचिनची टीम पुन्हा फायनलमध्ये… पाहा 49 वर्षीही सचिनचा ‘मास्टर क्लास’ रहाणे पहिलं विजेतेपद मिळवून देणार? दरम्यान सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात मुंबईनं एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. 2009 पासून आतापर्यंत झालेल्या 13 स्पर्धांमध्ये मुंबईच्या संघानं फायनल देखील गाठलेली नाही. पण यंदा रहाणेच्या नेतृत्वात मुंबईची टीम पहिल्यांदा ही ट्रॉफी जिंकणार का हे पाहावं लागेल. मुंबईच्या या टीममध्ये कर्णधार रहाणेसह पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी, शिवम दुबे हे भारताकडून खेळलेले अनुभवी शिलेदार आहेत. तर त्याशिवाय डोमेस्टिक क्रिकेट गाजवणारे यशस्वी जैसवाल, सरफराज खान, शम्स मुलानी, तुषार देशपांडेसारखे युवा खेळाडूही आहेत. हेही वाचा - T20 World Cup: बुमराच्या जागी कुणाला संधी? शमी, दीपक चहरऐवजी ‘या’ बॉलरची होतेय चर्चा 11 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात 11 ऑक्टोबरपासून यंदाच्या मुश्ताक अली टी20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबईचे साखळी सामने हे राजकोटमध्ये होणार आहेत. मुंबईचा संघ अजिंक्य रहाणे (कॅप्टन), यशस्वी जैसवाल, पृथ्वी शॉ, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेट किपर), शार्दूल ठाकूर, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अमन खान, साईराज पाटील, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी