कोल्हापूर, 19 डिसेंबर : मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती येथील पौर्णिमा यात्रेनंतर भाविकांना ओढ्यावरील रेणुका देवीच्या आंबील यात्रेचे वेध लागतात. उदं ग आई, उदं… च्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात
कोल्हापुरातील
हीच आंबील यात्रा नुकतीच पार पडली. भल्या पहाटेचा अभिषेक, देवीची आरती, पालखी सोहळा, मानाच्या जगांचे पूजन, वडी, भाजी-भाकरीचा नैवेद्य, भंडाऱ्यांची उधळण, भाविकांची अलोट गर्दी, असे सगळे उत्साही वातावरण या ओढ्यावरील रेणुका देवीच्या आंबील यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात दरवर्षी बघायला मिळत असते. सौंदती डोंगरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री रेणुका देवीचा कंकण विमोचन सोहळा नुकताच पार पडला. या विधीसाठी कोल्हापुरातून सौंदत्तीला गेलेले मानाचे जग परत येतात. ते परत आल्यानंतर ओढ्यावरील रेणुका देवी मंदिरात आंबील यात्रा पार पडत असते. काय असतो देवीला नैवेद्य? कोल्हापुरच्या मंगळवार पेठेत हे रेणुका मंदिर आहे. या ठिकाणी ही यात्रा भरत असते. या यात्रेनिमित्त पहाटे देवीचा महाअभिषेक करण्यात येतो. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा असतात. पूजा बांधल्यानंतर सकाळी देवीची आरती करण्यात येते. नैवेद्य दाखवण्यासाठी मात्र मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी होत असते. दुपारी चार वाजता देवीची पालखी काढण्यात येते. पहाटेपासून भाविक देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिर परिसरात अलोट गर्दी करत असतात.
बांबूमध्ये बनवलेली शाकाहारी बिर्याणी, टेस्टी आणि हेल्दीही! पाहा Video
यात्रेच्या दिवशी रेणुका देवीचे आवडते अन्नपदार्थ दहीभात, आंबील, वडी-भाकरी, वरणा-वांग्याची भाजी, मेथीची भाजी, गाजर, केळी, कांद्याची पात, लिंबू अशा भाज्या व फळे देवीला अर्पण केले जात आहेत. पारंपारिक नैवेद्याबरोबरच अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून गेली दहा वर्षे मंदिर प्रशासनातर्फे नैवेद्य मंदिराच्या बाहेरच स्वीकारले जात आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी विधवा होते. त्या दिवसापासून देवी आणि तिचे जोगती कुंकू, सौभाग्यालंकारांचा त्याग करतात. या पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी ही आंबील यात्रा पार पडत असते. ही पार पाडणारी आंबील यात्रा म्हणजे देवीला सांत्वनाचा घास भरवायचा असतो. या दिवसापासून पुन्हा कुंकू आणि सौभाग्यालंकार घातले जातात
अंबाबाई मंदिरात दर शुक्रवारी होणार कुंकूमार्चन सोहळा, पाहा काय आहे महत्त्व? Video
पहाटेपासून रात्री 9 वाजेपर्यंत या यात्रेसाठी हजारो भाविक येतात. देवीला भाजी भाकरी आंबील घुगऱ्या वडी इ. चा नैवेद्य दाखवला जातो. रात्री सर्व जग आपल्या ठिकाणी मार्गस्थ होतात आणि यात्रा संपन्न होते. त्यानंतर घरातला नैवेद्य करून दुसऱ्या दिवशी देव बोलवले जातात, अशी माहिती जोगतीण लक्ष्मी कोल्हापूरकर यांनी दिली आहे. या पद्धतीनं धार्मिक महत्व असलेली ही ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा दरवर्षी अशाच उत्साही वातावरणात, आणि भक्तांच्या गर्दीत पार पडत असते.
गुगल मॅपवरून साभार
मंदिराचा पत्ता : ओढ्यावरील रेणुका मंदिर, दत्त कॉलनी, मंगळवार पेठ, कोल्हापूर - 416001