कोल्हापूर, 17 डिसेंबर : लाखो भाविक ज्या ठिकाणी भक्तीभावाने लीन होतात, अशा साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात कुंकूमार्चन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मार्गशीर्ष शुक्रवारच्या निमित्ताने मंदिरात पुन्हा सुरू करण्यात आलेला हा कुंकूमार्चन सोहळा आता वर्षभर दर शुक्रवारी नियमितपणे पार पडणार आहे. अंबाबाई मंदिरात पार पडणाऱ्या कुंकूमार्चन सोहळा यावेळी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे व्यासपीठावर श्रीयंत्र प्रतिष्ठापित करण्यात येते. शुक्रवारी या विधीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी विधीतील सहभागी सर्व महिलांना श्री यंत्र, कुंकू आणि द्रोण देवस्थान समितीकडून देण्यात आले होते. त्यांनी द्रोणमध्ये श्रीयंत्र ठेवून त्यावर सलग 1 हजार वेळा अंबाबाईचा नामजप करत कुंकूमार्चन केले. काय आहे धार्मिक महत्व? सौभाग्याचे म्हणजेच सकल समृध्दी आणि आनंदाचे प्रतीक असणारे कुंकू देवीच्या चरणांवर अर्पण करण्याचा धार्मिक विधी म्हणजे देवीला प्रिय असणारा कुंकूमार्चन सोहळा आहे. 108 वेळा, सहस्त्र वेळा अशा पद्धतीने हा विधी केला जातो. जितक्या वेळा हे कुंकू देवीला अर्पण करू, तितक्या वेळा आपल्या तोंडून देवीचे नामस्मरण घडतं हा एक भाग आहे. देवी लक्ष्मीला आवडत नाहीत या 6 गोष्टी, श्रीमंतांनाही बनवतात गरीब! दुसरं म्हणजे देवीच्या प्रत्येक नावाबरोबरच वेगवेगळ्या तिच्या नावांशी जोडल्या गेलेल्या अनेक कथा आहेत. त्या देवीच्या सगळ्या कथांचे देखील या निमित्ताने स्मरण होते. त्यामुळे देवी चरित्राचा देखील एक धावता आढावा या विधीमुळे होतो. या सगळ्यांमुळेच या धार्मिक विधीला एक विशेष महत्त्व आहे, अशी माहिती मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे. यापूर्वी कुंकूमार्चन सोहळा हा महिलांसाठी घेण्यात येत होता. कोरोना कालावधीत मंदिर बंद असताना तो झाला नाही. मंदिर उघडल्यानंतर समितीने श्रावण महिन्यात दर शुक्रवारी हा सोहळा महिनाभर सुरू करण्यात आला होता. तो देखील श्रावण महिना संपल्यानंतर तो बंद केला होता. अनेक महिलांनी कुंकूमार्चन सोहळा दर शुक्रवारी पूर्वी प्रमाणे सुरू करण्याची मागणी आणि विनंती केली होती. त्यानुसार आता हा कुंकूमार्चन सोहळा वर्षभर दर शुक्रवारी पार पडणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले आहे. मुंबईतील हनुमान मंदिरात आहेत 1 लाखांपेक्षा जास्त घंटा, पाहा काय आहे कारण? या कुंकूमार्चन सोहळ्याच्या धार्मिक विधीमध्ये आता प्रत्येक शुक्रवारी १०० महिलांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी मंदिर समितीकडे दर गुरुवारी आधारकार्डच्या झेरॉक्ससह मंदिरात नोंदणी करणे आवश्यक आहे, असेही देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले आहे. मंदिराचा पत्ता : महालक्ष्मी मंदीर, ए वॉर्ड, शिवगंगा कॉलनी, कोल्हापूर - 416001
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.