JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / 'या' मंदिराला एकही खांब नाही, वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना, पाहा हा VIDEO

'या' मंदिराला एकही खांब नाही, वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना, पाहा हा VIDEO

या ऐतिहासिक मंदिराला एकही खांब नाही. त्यामुळे हे मंदिर इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या औत्सुक्याचा विषय ठरते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 6 मे : कोल्हापूरची ख्याती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामुळे सर्व दूर पसरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भावी येत असतात. तर बाहेरगावाहून आलेले भाविक हे अंबाबाई मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या ऐतिहासिक बिनखांबी गणेश मंदिराला देखील आवर्जून भेट देत असतात. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चोहो दिशांना असंख्य मंदिरे आहेत. त्यापैकीच एक बिनखांबी गणेश मंदिर हे अंबाबाई देवीच्या मूळ मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. काय आहे वैशिष्ट्य? या हेमाडपंथी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एकही खांब नाही आहे. त्या कारणानेच या मंदिराचे बिनखांबी गणेश मंदिर असे नाव प्रचलित आहे. तर जोशिराव गणपती म्हणूनही ओळख असणारे हे गणेशाचे मंदिर कोल्हापुरातील काही प्रमुख गणेश मंदिरांपैकी एक आहे. भव्य दगडी बांधकामातील हे मंदिर हे कोल्हापूरकरांसह येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या औत्सुक्याचा विषय ठरते.

काय आहे मंदिराचा इतिहास ? वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले हे गणेश मंदिर दोन खणी असून सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराच्या पिछाडीस असणाऱ्या जोशीरावांच्या वाड्यातील विहिरीचा गाळ काढताना ही मंदिरातील गणेशमूर्ती मिळाली होती. त्यानंतर नागरिकांच्या विनंतीनुसार नागरिकांनी, जोशीराव आणि त्यावेळचे कोल्हापूरचे छत्रपती यांनी या मूर्तीची या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली होती, अशी माहिती मंदिरातील पुरोहित योगेश दिनकर पाटील-व्यवहारे यांनी दिली आहे. तर करवीर महात्म्य या ग्रंथात या गणेशाचा उल्लेख इच्छापूर्ती गणेश असा असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. कशी आहे मंदिराची रचना? निवृत्ती चौक ते मिरजकर तिकटी या रस्त्यावर असणाऱ्या चौकात हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारवर दगडी कमान आहे. आतमध्ये सुरुवातीला साधारण 20 फूट बाय 20 फूट अशा लांबी-रुंदीचा भव्य दगडी सभामंडप आहे. मध्यभागी खाली कासव आणि वर घंटा बांधण्यात आलेली आहे. त्याभोवती कोरीव शिल्प आहे. तर सभामंडपात एकूण सहा देवळ्या आहेत. पुढे गर्भागारात चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील या चतुर्भज गणपतीच्या मूर्तीचे रूप अतिशय सुंदर आहे. साधारणपणे शिलाहार कालखंडातील वाटावी अशी ही मूर्ती आहे, असे मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.

Nagpur News: अद्भूत अशी कोराडीची महालक्ष्मी देवी, पाहा Video काय आहे आख्यायिका

संबंधित बातम्या

सध्या या मंदिरात मूर्तीवर लावलेला शेंदूर पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने उतरवला आहे. मंदिराला लावण्यात आलेला चुन्याचा रंग देखील काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराचे मूळ दगडी स्वरूप भाविकांना पाहता येत आहे. तर या मूर्ती नवीन प्रभावळ आणि सुंदर अलंकार चढविण्यात आलेले आहे. त्यामुळे मूर्तीचे सुंदर रुप अजूनच खुलून दिसत आहे. सध्या हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे आहे. वर्षभरात गणेश जयंती, गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी आणि दर मंगळवारी भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात. कुठे आहे मंदिर? M6VF+84C, सावरकर मार्ग, कोल्हापूर, महाराष्ट्र 416002

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या