विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 2 मे: विदर्भात अनेक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत. नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किमी अंतरावर असलेले कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे तमाम भाविकांचे शक्तीपीठ आहे. विदर्भासह लगतच्या राज्यामधून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कोराडी निवासिनीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. महालक्ष्मी जगदंबा देवी दिवसांतून तीन रुपात भाविकांना दर्शन देते अशी आख्यायिका आहे. तीन रूपात दर्शन देणारी देवी दरवर्षी आश्विन महिन्यातील नवरात्री व शारदीय नवरात्रौत्सवात कोराडी मंदिरात मोठी गर्दी होते. या दिवसात येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. महालक्ष्मी जगदंबा देवी भक्तांना दररोज तीन रुपात दर्शन देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात सकाळी देवी कुमारिका रूपात असते, दुपारी देवी सुहासिनी रुपात असते तर संध्याकाळी देवी प्रौढ स्त्रीच्या रुपात दर्शन देते अशी अख्यायिका आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे मंदिर आहे. वर्षाकाठी येथे लाखो भाविक येथे येत असतात. मागील शारदीय नवरात्रौत्सव व आश्विन नवरात्रौत्सवात 18 लाख 60 हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. जगदंबा आणि महालक्ष्मी अशी दोन्ही रुपे एकाच देवी मध्ये बघायला मिळतात. देवीच्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष पुरातन असून नवसाला पावणारी देवी म्हणून कोराडी देवी मानली जाते, अशी माहिती राघवेंद्र टोकेकर यांनी दिली. भक्त निवास बनलं मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेला या महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे नुकतेच नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. या दरम्यान भक्तांच्या निवासासाठी 165 खोल्यांचे सर्व गोष्टींनी सुसज्ज असे भक्त निवास बांधण्याचे ठरले होते. मात्र मधल्या काळात कोरोना संकट आले आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांची गरज लक्ष्यात घेता भक्त निवास ऐवजी मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर प्रशासनाने घेतला. मध्य भारतातील एक महत्त्वपूर्ण आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असे हॉस्पिटल लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जलकुंडात उभे आहे ‘हे’ मंदिर, पाहा 1 हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा, Photos तलावात उभारणार 151 फूट हनुमान मूर्ती मंदिराच्या सौंदर्यकरणाकरिता विशेष लक्ष मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मंदिरालगत असलेल्या तलावात 151 फूट हनुमान मूर्ती चे कार्य प्रगतीपथावर असून आगामी काळात एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. दर्शनासोबतच मनोरंजन आणि पर्यटन सोबतच स्थानिकांच्या रोजगाराला हातभार लागावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती राघवेंद्र टोकेकर यांनी दिली. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)