सुदर्शन कानवडे, प्रतिनिधी अहमदनगर, 21 जून: महाराष्ट्रात अनेक पुरातन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. या मंदिरांसोबत काही आख्यायिका आणि दंतकथा जोडल्या गेलेल्या असतात. अहमदनगर जिल्ह्यात अशीच काही प्राचीन मंदिरे असून त्यासोबत आख्यायिकाही आहेत. टाहाकारी येथील जगदंबा माता मंदिर हे त्यापैकीच एक आहे. आकर्षक कोरीव काम आणि दगडी बांधकाम असणाऱ्या या मंदिराबाबत अशाच काही आख्यायिका असून त्या रामायण आणि महाभारताशी जोडल्या गेलेल्या आहेत. दंडकारण्यातील जगदंबा मातेवर भाविकांची श्रद्धा सह्याद्री पर्वत रांगेतील दंडकारण्यात आढळा नदी तिरावर टाहाकरी हे गाव आहे. अकोला तालुक्यातील या ठिकाणी जगदंबा मातेचं पुरातन मंदिर असून ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दगडी बांधकाम आणि कोरीव नक्षीकामामुळं हे मंदिर आकर्षक दिसतं. जगदंबा देवीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी लाखो भक्त या प्राचीन मंदिराला भेट देत असतात.
कसे आहे जगदंबा मंदिर? टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर जगदंबा मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असल्याचं सांगितलं जातं. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढब कळस बांधलेले आहेत. रामायणाशी संबंधित दंतकथा नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही श्री रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे, अशी आख्यायिका पुजारी दत्तात्रय एखांडे यांनी सांगितली. हेच ते मंदिर जिथे चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाची घेतली होती शपथ Special report सीता मातेमुळं पडलं टाहाकारी नाव टाहाकारी गावाच्या नावाबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते. तीही रामायणाशी संबंधित आहे. रावण सीता मातेला घेऊन जात असताना तिने वाचवा वाचवा असा टाहो फोडला. त्यामुळे या गावाचं नाव टाहाकरी पडलं, असेही एखांडे यांनी सांगितले. महाभारताशी संबंधित आख्यायिका जगदंबा मंदिराबाबत महाभारताशी संबंधितही आख्यायिका सांगितली जाते. जगदंबा मंदिर हे एका रात्रीत पांडवांनी बांधल्याचं सांगितलं जातं. मंदिर सध्या आहे त्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात बांधण्यात येणार होतं. पण पहाटे कोंबडा आरवला आणि पांडवांनी बांधकाम थांबवलं, अशीही आख्यायिका असल्याचं एखांडेंनी सांगितलं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)