मुंबई, 14 जानेवारी: हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ मध्ये मकर संक्रांती रविवारी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि १५ जानेवारी २०२३ रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. पंचांग माहितीनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पर्वकाल आहे. यावेळेस संक्रातीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. ती पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे. तिच्या हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा आहे. वयानी कुमार आहे आणि बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फुल तिने हातात घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीची असून भूषणार्थी मोती धारण केलेला आहे. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे. याचा अर्थ तिने जे जे परिधान केले आहे त्या सर्व गोष्टी आपण वर्ज करायच्या आहेत .उदा- तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण घालू नयेत .तिने जाईचे फूल घेतले आहे .त्या फुलांचा गजरा आपण केसात माळू नये. या दिवशी केले जाणारे विशेष पुण्यकर्म - तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे करून अंगास लावावे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण ( स्वतः खावेत )व तिलदान ( तिळगुळ दुसऱ्यांना द्यावेत )या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास पुण्य प्राप्त होते. सर्व प्रथम तिळगूळ देवा जवळ ठेवावेत. त्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणून हा सण साजरा करावा.
भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्व आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्य देव आपल्या पुत्राच्या म्हणजे शनी देवाच्या घरी त्याला भेटायला जातात कारण शनि हा मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हे पर्व पिता-पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद व समृद्धी घेऊन येणारे असते. या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात. स्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना तिळगुळ आणि वाण (भेटवस्तू) देतात. संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथ सप्तमी पर्यंत केला जातो. तिळगुळ व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोबतच देश भरात बऱ्याच राज्यांमध्ये मकर संक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. लगातार तीन दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवल्या जातात आणि रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात. या काळात पूर्ण आकाश सुंदर असते व लोक ही खूप प्रसन्न व उत्साहात असतात. संक्रांतीच्या आधी येणारी भोगी, या गोष्टी केल्यास होईल फायदा संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळगुळ खातात. तिळ वापरण्यातला दुसरा अर्थ तिळातील स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आहे. या मिश्रणातून मैत्री, स्नेह आणि प्रेमातील गोडी वाढावी हा त्या मागचा हेतू असतो. म्हणून या दिवशी तिळगूळ देण्याची प्रथा आहे. पण काळ बदलला आणि त्या बदलत्या काळाबरोबर हल्ली आपण आपल्या सणवार साजरे करण्याच्या परंपरा ही नकळतपणे बदलत चाललो आहोत. त्यामागील उद्देश सगळे काही विसरलो. आज संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळाचे चित्र असलेले मेसेज एकमेकांना पाठवतो. त्यामुळे व्हाट्सअप वर फक्त तिळगुळ पहायला मिळतात पण प्रत्यक्ष हातामध्ये मात्र एकही तिळगुळ नसतो. कारण आपल्या जवळच्या माणसांना एक मेसेज सेन्ट केला की आपली जबाबदारी संपली या विचारामुळे ह्या सणात फक्त औपचारिकता उरलेली दिसून येते. योगिनी डॉ. स्मिता राऊत ज्योतिषी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)