मुंबई, 13 जानेवारी: संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी . भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. या पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके विपुल प्रमाणात तयार झालेली असतात. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून वर्षानुवर्ष पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. भोगी साजरी करण्या मागील उद्देश - शेतात आलेल्या नविन पिकांचा उपभोग घेणे म्हणजे भोगी. या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या जसे पावट्यांचे दाणे, वांगी , गाजर , बोर, वाटाणा, पावटा , पापडी अशा विविध भाज्या एकत्र करून त्यात तिळाचा कूट घालून ती भाजी तयार करतात. तर काही भागात पालेभाज्यांची मिक्स भाजी केली जाते. त्या बरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, लोणचे, पापड, तिळाची चटणी खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडी असा बेत असतो.
या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतु असल्याचे लक्षात येते. भोगीच्या दिवशी केली जाणारी मिक्स भाजी खूपच पौष्टिक असते. या पदार्थांमधून उष्णता मिळते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते. भोगीच्या दिवशी आपल्या शेतातील पिकांचा उपभोग घेऊन झाल्यावर आपल्या शेतातील पिकांचा नमुना (स्वाद )दुसऱ्यांना सुध्दा चाखायला मिळावा या उद्देशाने दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुहासिनी स्त्रिया देवाला सौभाग्याची आणि समृद्धीची प्रार्थना करत वाण-औसाच्या स्वरूपात त्या वस्तू एकमेकांना देतात या उद्देशाने ही पध्दत सुरु झाली. योगिनी डॉ. स्मिता राऊत ज्योतिषी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)