मुंबई, 25 ऑक्टोबर : आज सूर्यग्रहण होणार आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल, जे देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दिसणार आहे. प्रत्येक ठिकाणी या सूर्यग्रहणाची वेळही वेगळी असेल. द्रुक पंचांगनुसार, 25 ऑक्टोबर रोजी देशातील सूर्यग्रहण संध्याकाळी 4:28 वाजता सुरू होईल आणि सुमारे 5.30 वाजता संपेल. देशात दिसणारे हे दुसरे सूर्यग्रहण असेल, जे अंशतः पाहता येईल. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, ते पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. वास्तविक, काहीवेळा ते उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे हानिकारक ठरू शकते. गरोदर महिलांना सूर्यग्रहण पाहू नये, कारण त्याचे दुष्परिणाम आईसोबतच पोटातील बाळावरही होऊ शकतात, असे म्हटले जाते. ग्रहणात गरोदर महिलांनी भाजी चिरू नये असेही म्हणतात, त्याविषयी पंचागतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली. भारतात दीपावली च्या दिवशी सूर्यग्रहण दिसण्याचा योग 27 वर्षानंतर येत आहे. यापूर्वी 24 ऑक्टोबर 1995 ला दीपावली अमावास्येला झालेले खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसले होते. यानंतर 10 वर्षानी 3 नोव्हेंबर 2032 रोजी दीपावली अमावास्येला होणारे सूर्यग्रहण उत्तर भारतातून दिसणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सोमण यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, गरोदर महिलांनी ग्रहणात भाजी चिरली तर विकृत मूल जन्माला येते हाही एक गैरसमज आहे. युरोपमध्ये थायलिडोमाइड नावाचे चुकीचे औषध घेतल्यामुळे हजारो विकृत मुले जन्माला आली. ती चुकीच्या औषधामुळे आली होती, ग्रहणामध्ये भाजी चिरल्यामुळे नाही.
तसेच सूर्यग्रहण ग्रहण चष्म्यातूनच पहावे. साध्या डोळ्यानी पाहू नये. दृष्टीस इजा होते. ठाणे येथे कोलशेत खाडी किनाऱ्यावरून ग्रहण दाखविण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. ग्रहण पहायला चष्माही फ्री देणार आहोत. चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन ग्रहण निरीक्षण करता येते. वेल्डरच्या काचेतूनही निरीक्षण करता येते, असे सोमण यांनी सांगितले. हे वाचा - 27 वर्षांनी दिवाळीत असा योगायोग; सूर्यग्रहणात काय करावं, काय टाळावं जाणून घ्या जे लोक 25 ऑक्टोबरचे सूर्यग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे सूर्यग्रहण शुभ आहे. कारण निसर्गाने दिलेल्या संधीचा ते शिकण्यासाठी फायदा करून घेणार आहेत. जे लोक ग्रहण पाहणार नाहीत त्यांच्या राशीला हे ग्रहण अशुभ आहे, कारण आलेली शिक्षणाची संधी ते दवडणार आहेत, असे ही ते म्हणाले.