JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ashadhi Wari 2023: शिव तुझे नाव ठेविले पवित्र.., शिवबा, तुकोबा आणि वारीचा कसा आहे संबंध? Video

Ashadhi Wari 2023: शिव तुझे नाव ठेविले पवित्र.., शिवबा, तुकोबा आणि वारीचा कसा आहे संबंध? Video

Ashadhi Wari 2023: तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज हे भक्ती-शक्ती मार्गाचा अनोखा संगम मानला जातो. शिवबा, तुकोबा आणि पंढरपूरची वारी यात एक खास संबंध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 11 जून: शिव तुझे नाव ठेविली पवित्र |छत्रपती सूत्र विश्वाचे || जगतगुरु तुकाराम महाराजांनी शिवरायांचे या समर्पक शब्दात वर्णन केले आहे. तुकोबराय आणि शिवरायांनी महाराष्ट्राला ज्या दोन प्रवाहांनी समृद्ध केलं ते दोन प्रवाह भक्ती आणि शक्ती मार्ग होय. हे दोन मार्ग भिन्न नव्हते तर त्यांचा अनोखा संगम होता. एक विठ्ठल तर एक रुख्माई, दोन्ही मार्गात व्दैत असं नाहीच काही, असं तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे सांगतात. वारी भक्ती-शक्तीचा अनोका मेळा संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून, भक्तिमार्गातून एक रोकडेपण जनमानसात रुजवलं, धर्मव्यवस्थेच्या नावाखाली जनतेला छळणाऱ्यांना धारेवर धरलं. भेदा-भेदांच्या अमंगळ भिंती उध्वस्त केल्या. योग्य धर्माची जाण करून देणारा हा धर्मयोद्धा ठरला. तर शिवरायांनी जुलमी राजवटींना शक्तिमार्गातून वेसण घातली. स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास आणलं. या भक्ती-शक्ती मनोमिलनानं अख्ख्या महाराष्ट्राचं भलं केलं. वारीच्या रूपानं हा भक्तीशक्तीचा अनोखा मेळा गेली शेकडो वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे.

संभाजी महाराजांनी केलं वारीचं रक्षण जगतगुरू तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराजांनी सुरू केलेल्या या वारी परंपरेत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू झाली. त्याच काळात महाराष्ट्रात यवनी आक्रमणाचे सावट होते. सगळीकडे इस्लामी आक्रमणाची छाया असतांना नारायण महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संवाद साधला आणि वारीला या जुलमी आक्रमणापासून संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. संभाजी महाराजांनी या वारीला सर्वार्थाने संरक्षण मिळवून दिले आणि हा पालखी सोहळा तिथून पुढे सुखरूप सुरू राहिला. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या योगदाना मुळेच हा पालखी सोहळा आज आपण मोठ्या उत्साहात होत असल्याचे पाहू शकतो आहोत. त्यांनी त्याकाळी मोगली आक्रमण पूर्णतः थोपवून या देशाचे, धर्माचे, परंपरेचे रक्षण केले, अशी माहिती शिरीष मोरे यांनी दिली. महाराष्ट्र धर्म टिकवण्यात वारकरी परंपरेचे योगदान महाराष्ट्रात धर्म टिकवण्यासाठी वारकरी सांप्रदायाचे, संत परंपरेचे फार मोठे योगदान आहे. ज्ञानोबा पासून ते तुकोबारायांपर्यंत या संतांनी जेव्हा धर्माला ग्लानी आली होती, यवनांचे परचक्र माजले होते, अशावेळी इथल्या सर्व समाजाला जागृत ठेवण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला. त्यातून भक्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार- प्रचार केला. ज्ञानोबा- तुकोबांनी धर्म टिकवला म्हणून टिकवलेल्या धर्मावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तुकोबा आणि शिवरायांचा कार्यकाळ सारखाच आहे. दोघांचे कार्यक्षेत्र हे जवळजवळ सारखे आहे. दोघेही महापुरुष एक ब्रीद उराशी बाळगून ध्येय प्राप्तीसाठी पेटून उठलेले आहेत. ते म्हणजे महाराष्ट्राचा उद्धार करणे हे होय. तुकोबांचे जे ब्रीद आहे तेच शिवरायांनी अंगीकारले आहे, असेही मोरे यांनी सांगितले. Ashadhi Ekadashi: तुकाराम महाराजांची पालखी कधी सुरू झाली? थेट वंशजांनीच सांगितला इतिहास, Video शिवबा-तुकोबा संबंध वारकरी परंपरेत शिवरायांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शिवरायांनी एकेकाळी तुकोबारायांना नजराना पाठविला होता. मात्र तुकोबांनी तो आहे तसा शिवरायांना परत पाठवला आणि शिवरायांना नऊ पानाचे एक सुंदर पत्र पाठवले त्यातील शब्दन - शब्द अतिशय सुंदर असून शिवराय आणि तुकोबा यांच्यातील नात्यांचा उलगडा त्या पत्रातून आपल्याला करता येईल. त्या पत्रातून शिवरायांना कळले की हा संत काही अलौकिक असून शिवबांनी स्वतः तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन तुकोबांची भेट घेतली. तुकाराम महाराजांनी वेळोवेळी शिवरायांना उपदेश दिले आणि शिवरायांनी ते अंगीकारले. शिवरायांच्या स्वातंत्र्याला जर अधिष्ठान कुणाचे असेल तर ते तुकोबारायांचेच आहे त्यावरच या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीस हातभार लागला आहे, अशी माहिती तुकोबारायांचे वंशज शिरीष मोरे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या