विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 9 जून : जून महिना सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागतात. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी ग्यानबा-तुकारामाचा जयघोष करत आषाढी वारीत सहभागी होतात. जगदगुरू तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. शनिवारी (10 जून) रोजी ही वारी देहूहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करेल. यंदा तुकोबारायांच्या पालखीचं 338 वं वर्ष आहे. ही वारी 19 दिवसांचा प्रवास करत 28 जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल. या पालखीचा नेमका इतिहास काय आहे ? ही परंपरा महाराष्ट्रात नेमकी कधी आणि कोणी सुरू केली? या विषयावरील माहिती तुकाराम महाराजांचे वंशज शिरीषजी महाराज मोरे यांनी दिली आहे. काय आहे इतिहास? पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।व्रत एकादशी करीन उपवासी।गाईन अहर्निशी मुखी नाम।।नाम विठोबाचे घेईन मी वाचे।बीज कण्यांतीचे तुका म्हणे।। ‘माझ्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंड सुरू आहे. त्यामुळे इतर कुठलेही तीर्थाचे व्रत मी करीत नाही. पंढरीची वारी करताना एकादशीच्या उपवासाचे व्रत मात्र मी अगत्याने पाळतो. वारीची वाटचाल करताना आणि पंढरपूरच्या भूमीत गेल्यावर मुखी अहर्निश विठुरायाचा नामघोष सुरू असतो. विठुरायाचे नाम कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे ते कारण आहे. अश्या शब्दात जगद्गुरु तुकोबारांयांनी पालखी सोहळ्याचे महत्व त्यांच्या अभंगातून सांगितलं आहे.
मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी. परमेश्वराच्या चरणी लीन होणारी ही परंपरा दरवर्षी नित्यनेमाने अविरत चालू आहे. विशेषत: वारकरी संप्रदायात या परंपरेला मोठं महत्त्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. त्यापूर्वीपासून महाराष्ट्रात ही परंपरा सुरू आहे. तुकोबरायांच्या घराण्यातील मूळ पुरुष असलेले विश्वंभरबाबा नित्यनेमाने पंढरीची वारी करीत. त्यांच्या आईकडून हा वारसा त्यांच्याकडे आला होता. त्यानंतरच्या काळात तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी ही परंपरा पुढे नेली. देहूत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नेटके नियोजन; अशी केलीय व्यवस्था तुकोबारायांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपातील एक अंश आपल्या सोबत रहावा या हेतूने ताळ मृदुंग, भगवी पताका खांद्यावर घेऊन तुकोबांच्या आणि माऊलींच्या पादुक सोबत पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा नारायणबाबा यांनी सुरू केली. सुरवातीला दिंडी स्वरूपातील हा सोहळा होता. देहुतून तुकोबारायांच्या तर आळंदी येथील माऊलींच्या पादुका घेऊन मजल दर मजल करत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असे नारायणबाबा सुरू केलेली ही परंपरा आज पालखीच्या रूपाने देखील कायम आहे. जगद्गुरु तुकोबारांयांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे 338 व वर्ष असून हा सोहळा 28 जूनला 19 दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपूरला दाखल होणार आहे. अशी माहिती जगद्गुरु तुकोबारांयांचे वंशज शिरीष जी महाराज मोरे यांनी दिली.