ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 18 फेब्रुवारी: लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते. शिवरात्रीच्या आदल्या रात्री बारा वाजता संपूर्ण गवळी समाज बांधवाकडून सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात येतो. यानंतरच सिद्धेश्वराची पूजा अभिषेक केला जातो. ही प्रथा फार जुनी असून लातूर शहरातील गवळी समाजाला हा मान आहे. गवळी समाजाला पहिला मान लातूरमधील समाज व्यवस्था व लातूर शहराची रचना पाहिली तर प्रत्येक समाजाची एक वसती आहे. शहरातील विविध कार्यक्रमात सर्व समाजबांधव सहभागी होतात. महाशिवरात्रीला ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वराची यात्रा असते. या यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते. यात्रेतील पहिला मान गवळी समाजाला आहे. पहिल्यांदा गवळी समाज बांधव शिवमूर्तीला दुधाचा अभिषेक घालतात. त्यानंतरच नियमीत पूजा अर्चा आणि अभिषेकाला सुरुवात होते. Mahashivratri 2023: बावडीतील शिव मंदिर पाहिलंत का? महाशिवरात्रीलाच असतं खुलं, Video गवळी समाज शिव उपासक गवळी समाज हा शिव उपासक म्हणून ओळखला जातो. परंपरागत दुधाचा व्यवसाय असल्याने दुग्धाभिषेकाचा मान गवळी समाजाकडे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. त्यामुळे गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने घरातील दूध घेऊन अभिषेकासाठी मंदिरात येतात. मंदिरातील पिंड दुधाने बुजवली जाते. दुसरा मान भोई समाजाला सिद्धेश्वराच्या यात्रेत दुसरा बहुमान सिद्धेश्वरांची पालखी वाहण्याचा आहे. हा मान हा भोई समाजाकडे देण्यात आला आहे. पालखी वाहन्याची परंपराही खूप जुनी असून पालखी सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित असतात. Mahashivratra 2023 : गुरुचरित्रामध्येही उल्लेख असणारे तारकेश्वर मंदिर, पाहा काय आहे इतिहास, Video 700 वर्षे जुने मंदिर सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे 700 वर्ष जुने असल्याचे सांगतिले जाते. या मंदिरातील एका शिलालेखावरील माहिती ही संस्कृत भाषेत आहे. पुरातत्व विभागाकडून शिलालेखाचे वाचन करण्यात आले तेव्हा हे शिल्प 700 वर्ष जुने असल्याचे सांगण्यात आले. या मंदिराच्या भिंतीवर अनेक कोरीव शिल्प, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, हत्ती, घोडे, देव देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तीन हत्ती कोरलेले आहेत. हत्ती हे शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. लातूरचे जुने नाव रत्नापूर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1910 करण्यात आला. या मंदिराबाबत इतिहासामध्ये अनेक पुरावे मिळतात रत्नापूर महात्म्य या धर्मग्रंथांमध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा दाखला दिला आहे. लातूरचे पूर्वीचे नाव रत्नापूर होते. त्यामुळे रत्नेश्वर हे लातूरचं ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते, अशी माहिती इतिहासकार विवेक सौताडेकर यांनी दिली.