नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 18 फेब्रुवारी : प्रत्यक्ष प्रभू श्रीराम चंद्र यांच्या पद स्पर्शाने पावन झालेला परिसर म्हणजेच जालना जिल्ह्यातील पांगरी येथील शंभू महादेव मंदिर परिसर आहे. भक्ती, शक्ती आणि अलौकिक निसर्ग संपदा असा त्रिवेणी संगम असलेल्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दूरदूर वरून भाविक येतात. या मंदिराचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळत असल्याने मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. काय आहे आख्यायिका? जालना शहरापासून 50 किमी अंतरावर असलेले भगवान शंकराचे अतिशय प्राचीन शंभु महादेव मंदिर आहे. प्रभू श्रीराम यांना 14 वर्षांचा वनवास झाला तेव्हा ते वन गमन करत असताना येथे आले होते. पौराणिक आख्यायिकेनुसार महादेवाचा भक्त असलेला शंभू राक्षक इथे तपस्या करायचा. चरण्यासाठी येणारी जनावरे ही त्याची भक्ष होती. काहीच दिवसात या राक्षसाने परिसरातील जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना जेव्हा ही गोष्ट कळली. तेव्हा लक्ष्मणाने या राक्षसाचा वध केला. मात्र, शिवभक्त असलेल्या राक्षसाचा वध केल्याने लक्ष्मणाला पश्चाताप झाला. तेव्हा प्रभू श्रीराम यांनी या राक्षसाला उषाप दिला की जोपर्यंत सूर्य चंद्र असेल तोपर्यंत इथे शंभू महादेव म्हणून लोक तुझी पूजा करतील, असं शंभू महादेव मंदिर पुजारी शंभू गिरी यांनी सांगितले.
Mahashivratra 2023 : गुरुचरित्रामध्येही उल्लेख असणारे तारकेश्वर मंदिर, पाहा काय आहे इतिहास, Video
7000 वर्षे प्राचीन मंदिर भाविक भक्तासाठी हे स्थळ श्रध्दास्थान असून लोक इथे दर सोमवारी येऊन भक्ती भावाने दर्शन घेतात. श्रावण महिन्यात इथे भाविकांची विशेष गर्दी असते. महादेवाचे दर्शन घेण्याबरोबरच येथील नयनरम्य निसर्ग सौंदर्य भक्तांना भूरळ घालते. महाशिवरात्रीला इथे छोटेखानी यात्रा भरते. महादेवाच्या चरणी लोक बेलपत्र अर्पण करतात. नवस बोलतात व तो पूर्ण झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी इथे येतात. हे मंदिर तब्बल 7000 वर्षे प्राचीन आहे, असंही पुजारी शंभू गिरी यांनी सांगितले. जागृत देवस्थान आहे मी इथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परिवारासोबत आले आहे. हे जागृत देवस्थान आहे. नांदेड, परभणी, जालना, पुणे, मुंबई अशा शहरातून देखील लोक इथे येतात. श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला इथे यात्रा भरते,असं भाविक रमा साबळे यांनी सांगितले.